भाजपच्या दबावाला भीक घालणार नाही, ठाकरे गटाच्या नेत्याने थेट भाजपलाच उत्तर दिलं…
एसीबीची नोटीस देऊन आम्हाला ग्रामपंचायत निवडणुकीपासून लांब ठेवण्याचे षडयंत्र भाजपकडून सुरू आहे.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधातील लोकप्रतिनिधींना एसीबी, ईडीची नोटीस पाठवून भीती घालून भाजपमध्ये प्रवेश करायला लावणाऱ्या दबावाला आपण बळी पडणार नाही असं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. मागील महिन्यात त्यांना एसीबीकडून नोटीस पाठवून गेल्या 20 वर्षातील माहिती त्यांच्याकडून मागवण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी ही माहिती देण्यासाठी ते एसीबी कार्यालयात आपल्या समर्थकांसह नेते राजन साळवी यांच्यासोबत हजर राहिले आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आमदार प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ज्या प्रमाणे दबाव टाकून शिंदे गटात प्रवेश करायला लावला. त्या प्रमाणे आम्ही या नोटीसीला भीक घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार वैभव नाईक यांना एसीबीकडून मागील महिन्यातच नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जी माहिती पाहिजे ते देऊन आम्ही सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या सोबतच त्यांच्या पत्नीला आणि भावालाही नोटीस देण्यात आली आहे. मात्र ही नोटीस देण्यात आली असली तरी आम्ही पोलिसांना सर्व माहिती देऊन सहकार्य करणारच आहोत, मात्र भाजपच्या दबावाल बळी पडणार नाही अशी स्पष्ट त्यांनी भूमिकाही मांडली.
एसबीची नोटीस दिल्यानंतर टीव्ही नाईनशी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपची ही एक प्रकारची अघोषीत आणीबाणी आहे. ज्या लोकांना भाजपकडून बोलवलं जात आहे.
आणि जी लोकं त्यांच्याकडे जात नाहीत. त्यांना अशा प्रकारच्या नोटीस देऊन त्रास देण्याचा कार्यक्रम भाजपकडून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आह.
आमदार वैभव नाईक यांनी ही नोटीस आल्यानंतर म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज अर्ज छानणी असतानाही अशा प्रकारची नोटीस देऊन ग्रामपंचायत निवडणुकीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जात आहे अशी टीका त्यांनी केली आहे.