कल्याणमध्ये दोन गटांत हाणामारीदरम्यान अॅसिड हल्ला, सहाजण गंभीर जखमी
कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात अबीद अन्सारी आणि रिंकू मंडल हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये एका घरावरून गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे.
कल्याण : कल्याणमध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे. इथे अॅसिड हल्ल्यामध्ये तब्बल 6 जण जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये अॅसिड हल्ला करण्यात आला. या अॅसिड हल्ल्यात सहाजण जखमी झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. (Acid attack during clashes between two groups in Kalyan six seriously injured)
कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात अबीद अन्सारी आणि रिंकू मंडल हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये एका घरावरून गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. काल काही लहान मुलं खेळत असताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला होता.
या हाणामारीत हल्ला करताना अॅसिडचा वापर केला गेला. हे अॅसिड अंगावर फेकल्याने मेहजबीन अन्सारी, ललिता विश्वकर्मा, टिंकू मंडल, रेणू मंडल आणि तब्बसूम अन्सारी आणि एक इतर महिला या जखमी झाल्या. मेहजबीन व ललिता या गंभीर जखमी झाल्या आहेत. या सगळ्य़ा जखमींवर कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र, यापैकी नेमके अॅसिड कोणी कोणावर फेकले याचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलिसही संभ्रमात आहेत. त्याचा छडा लावण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या अॅसिड हल्ल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
याप्रकरणी कल्याणचे एसीपी अनिल पवार यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. ॲसिड कोणी आणि कशासाठी आणला होता याचा शोध सुरू आहे. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले आहेत. तर कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या –
अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्यांना तातडीने मदत द्या, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
(Acid attack during clashes between two groups in Kalyan six seriously injured)