मोठी बातमी ! ‘त्या’ विधानामुळे संजय राऊत अडचणीत; अजित पवार यांच्याकडून भाजपच्या आशिष शेलार यांचं समर्थन
कुणीही असो विधिमंडळ सर्वोच्च सभागृह आहे. थोर परंपरा असलेलं सभागृह आहे. त्याचा अभिमान सर्वांना आहे. खरंच तसं म्हटलं की नाही ते तपासून पाहिलं पाहिजे. सध्याच्या काळात शब्दांचा वापर दोन्ही बाजूने होतो.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्याचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर महाराष्ट्र द्रोह केला आहे. उद्या कुणीही सभागृहातील सदस्यांना काहीही म्हणेल. त्यामुळे आताच जरब बसणे आवश्यक आहे, असं आशिष शेलार म्हणाले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेलार यांचं समर्थन केलं. तर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांच्या विधानाशी असहमत असल्याचं सांगितलं. त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचं दिसून आलं आहे.
संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. बोटचेपी भूमिका घेऊ नका. विधिमंडळाच्या अपमानाबाबत अशी भूमिका घेऊ नका, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं. शेलार यांच्या या भूमिकेचं अजित पवार यांनी समर्थन केलं. मात्र, कारवाई करण्यापूर्वी नेमकं त्यांनी असं विधान केलंय का ते तपासून पाहिलं पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
कोणत्याही पक्षाचे असो समज द्या
आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या. कोणत्याही नेत्याला, व्यक्तीला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर एक बातमी आली आहे. एका व्यक्तीने विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं. शेलार यांच्या मताशी सहमत आहे. पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी पाळल्या पाहिजे. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला. पण काहीही बोलणं योग्य नाही. जे बोलले ते खरोखरच बोलले आहे का? त्यात तथ्य आहे का? जे बोलले त्यांची बाजू घेत नाही. पण शहानिशा केली पाहिजे. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता कामा नये. पण ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
देशद्रोही म्हणणंही योग्य नाही
कुणीही असो विधिमंडळ सर्वोच्च सभागृह आहे. थोर परंपरा असलेलं सभागृह आहे. त्याचा अभिमान सर्वांना आहे. खरंच तसं म्हटलं की नाही ते तपासून पाहिलं पाहिजे. सध्याच्या काळात शब्दांचा वापर दोन्ही बाजूने होतो. अध्यक्ष महोदय चोर मंडळ म्हणणं योग्य नाही. तसंच विरोधी पक्षातील सदस्यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही. शब्दांचा वापर सर्वांनीच योग्य पद्धतीने केलं पाहिजे. चोर मंडळ म्हणणं आम्हाला मान्य नाही, असं काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
आधी तो शब्द मागे घ्या
यावेळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी राऊत यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या अगोदर अनेक वरिष्ठ नेते या सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. बाहेर जे शब्द वापरले ते तुम्ही काढता. मग या ठिकाणी भाडखाऊ हा शब्द वापरला तो आधी मागे घ्या. मग बाकीची चर्चा करा, असं आव्हानच वायकर यांनी दिलं.
कामकाज तहकूब
दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना दिली आहे. ही सूचना प्राप्त झाल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. पण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर त्यावर निर्णय देत असताना सभागृहात गोंधळ झाल्याने सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं.