Ajit Pawar : ‘सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करणार का’; अजितदादांचा चढला पारा, म्हणाले…
शरद पवार अनेक नेत्यांवर कारवाया करत आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारताच अजित पवार भडकले आणि पाहा काय म्हणाले.
मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार अॅक्शन मोड मध्ये आले आहेत. रविवारी रात्रीपासूनच शरद पवारांचे हे बंड मोडून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. रविवारी रात्रीच जितेंद्र आव्हाड यांनी 9 आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे अर्ज केला आहे. आज सकाळपासूनच अनेक नेत्यावंर राष्ट्रवादीकडून कारवाई होत आहे. शपथविधीला उपस्थित असलेल्या काही नेत्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आता अजित पवारांकडून याला जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे देण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अजित पवार माझे मोठे भाऊ आहेत, त्यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. जे गेले ते माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. ही घटना मला अत्यंत्त वेदना देणारी आहे. अजितदादांवरील माझे प्रेम कायम राहील. नाती आणि कामात गल्लत नको याची जाणीव आहे, अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारच राहतील असे स्पष्ट केलं आहे. यासोबतच आपला गटच राष्ट्रवादी पक्ष असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवार अनेक नेत्यांवर कारवाया करत आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, आम्ही येथे कोणाची हकालपट्टी करायला आलेलो नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असल्याचं अजित पवार म्हणाले.
शरद पवारांनी विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील आणि मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या निवडीला आमचा आक्षेप आहे, आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्र देऊन त्यांना अपात्र करण्याचं आवाहन केल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यामध्ये मोठा भूकंप झाला आहे. काका-पुतणे आता अधिकृतपणे एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकले आहेत. आता अजित पवारांकडून मुंबईत राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळत आहे.