पडद्यामागच्या हालचाली काही कमी होईना, अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर खलबतं, नेमकं कारण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'देवगिरी' बंगल्यावर बैठकांवर बैठका होत आहेत. त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडतंय? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर आता लवकरच खातेवाटप होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावरील घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीय. अजित पवार आज दुपारी त्यांचा गडचिरोलीचा दौरा पूर्ण करुन मुंबईत आपल्या देवगिरी निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि रामराजे निंबाळकर हे देखील आले होते. विशेष म्हणजे संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह देवगिरी बंगल्यावर जावून अजित पवार यांची भेट घेतेली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर देवगिरी बंगल्यावर मंत्री धनंजय मुंडे दाखल झाले. नंतर देवगिरी बंगल्यावर महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती. या बैठकीत खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यावं या विषयी या बैठकीत खलबतं झाल्याची शक्यता आहे. तसेच इतर मित्र पक्षांकडून कोणती खाती देण्यात येत आहेत, याबाबतची चर्चा झाल्याची शक्यता आहे.
खातेवाटप आणि विस्तार कधी होणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता या सर्व मंत्र्यांसाठी खातेवाटप केलं जाणार आहे. तसेच मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तारही लवकरच होण्याची शक्यता आहे. या विस्तारात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला किती जागा मिळतात, तसेच या दोन्ही पक्षांना कोणती खाती मिळतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अजित पवार सत्तेत येताच शिवसेनेत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा समोर आली होती. शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली होती. या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भरपूर खलबतं झाली. त्यानंतर आता खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं मानलं जात आहे. पुढच्या दोन दिवसांत याबाबत सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे अनेक आमदारांचं लक्ष
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सत्ताधारी पक्षांच्या अनेक आमदारांचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिपद कुणाला मिळणार, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. शिवसेनेतील अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठीच शिवसेनेची साथ सोडल्याची चर्चा आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिमंडळात कितपत संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.