Ajit Pawar : अजित पवारांचं चर्चेतलं उत्तर, यात भाजपचा रोल दिसतो का? दादा म्हणतात, अजून तरी नाही
एकनाथ शिंदे भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करातान दिसून येत आहेत. मात्र दुसरीकडे अजित पवारांना या बंडामागे भाजपचा हात आहे का? असे विचारले असता त्यांनी तर थेट भाजपला क्लिनचिटच देऊन टाकलीय त्यामुळे याचीही सध्या जास्त चर्चा होत आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातलं राजकारण सध्या कोणत्या दिशेला जाणार हे अद्यापही निश्चित होताना दिसत नाही. एकिकडे तुम्ही मुंबईत येऊन भूमिका मांडा, आम्ही महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडायला तयार आहोत. असे सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) बोलताना दिसून आले. तर दिवसभर झालेल्या बैठकानंतर आम्ही सरकार टिकवण्यावर ठाम आहे, असाच सूर हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दिसून आला. मात्र काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीतल्या हॉटेलमधील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून घोषणा होताना दिसतेय. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करातान दिसून येत आहेत. मात्र दुसरीकडे अजित पवारांना या बंडामागे भाजपचा हात आहे का? असे विचारले असता त्यांनी तर थेट भाजपला क्लिनचिटच देऊन टाकलीय त्यामुळे याचीही सध्या जास्त चर्चा होत आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया
अनेक भाजप नेते दिसून आले
अजित पवार याबाबत बोलताना म्हणाले, आताच्या घडीला कोणताही भाजपचा नेता तिथं येऊन काही करतो असं काही दिसत नाही. त्यावर पत्रकारांनी भाजप नेत्यांची नाव सांगितली तर अजित पवार म्हणतात मी मोठा नेता म्हटलं असे म्हणत त्यांनी भाजपचा यामागे हात नाही, असेच जाहीर करून टाकल्यासारखे आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक भाजप नेते तिथे दिसून होते. सर्वात आधी भाजप आमदार संजय कुटे हे तिथं दिसून आले. त्यानंतर मोहित कंजोब, त्यानंतर गुवाहाटीत पोहोचल्यावर आसामचे मुख्यमंत्री असे अनेक नेते हे बंडखोर आमदारांच्या भेटीगाठी घेताना दिसून आले होते. मात्र एवढे नेते दिसल्यावरही अजित पवारांनी ही शक्यता का नाकारली याही सर्वांना पडलेला प्रश्न आहे.
मुख्यमंत्री असं करणार नाहीत
यानंतर अजित पवारांना यामागे मुख्यमंत्री असतील का ? असाही सवाल केला गेला. मात्र मी अडीच वर्षापासून त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे. ते अशा पद्धतीने स्वतहून बंड घडवून आणतील असं वाटत नाही. त्यांचा स्वभाव तसा नाही. ते खुल्या मनाने सांगतात मला हे असं करायचं आहे. मी करणार आहे, असे म्हणत त्यांनी ती शक्यताही फेटाळून लावली. मात्र आता एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडिओ समोर आल्याने राज्यातलं राजकारण मोठी वळणं घेणार हे स्पष्ट होत आहे.