गणपत गायकवाड गोळीबाराच्या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर, त्यादिवशी नेमकं काय घडलं?
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या प्रकरणाचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये हा सगळा प्रकार घडला. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जातोय. या दरम्यान आता या प्रकरणाचा पूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यावेळी केबिनमध्ये नेमकं काय घडलं होतं? ते स्पष्टपणे दिसत आहे.
मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी नेमकी चूक कुणाची याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना आता संपूर्ण घटनेचाच सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडते. त्यादिवशी नेमकी घटना काय घडते याबाबत न बोलता सविस्तर स्पष्टीकरण देणारं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी गणपत गायकवाड कसा गोळीबार करतात त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. त्यानंतर आता घटनेच्या सुरुवातीपासूनचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलीस निरीक्षण अनिल जगताप, महेश गायकवाड आणि राहुल पाटील केबिनमध्ये येतात. त्यानंतर काय-काय घडतं ते सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
नेमकं काय घडतं? सीसीटीव्हीत काय आहे?
सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप, महेश गायकवाड, राहुल पाटील आणि चैनू जाधव केबिनमध्ये येऊन बसतात. 11 वाजून 41 मिनिट वाजत असताना ते सर्वजण केबिनमध्ये येतात. अनिल जगताप यांनी सर्वांशी चर्चादेखील केली. यावेळी महेश गायकवाड सातत्याने मोबाईलमध्ये बघत असतात. राहुल पाटील हाताची घडी करुन बसलेले असतात. त्यानंतर महेश गायकवाड पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्याशी बातचित करत होते. यावेळी महेश गायकवाड सीसीटीव्ही फुटेज बघतात. बाहेर गोंधळ उडत असतो. तिथे असंख्य कार्यकर्ते जमलेले असतात.
यादरम्यान गणपत गायकवाड पोलीस निरीक्षकांच्या दालनात येतात. ते अनिल जगताप यांच्यासोबत हात मिळवतात. त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर ते बसतात. गणपत गायकवाड यांच्यासोबत आणखी दोन कार्यकर्ते येतात. गणपत गायकवाड येऊन सुद्धा महेश गायकवाड, राहुल पाटील हे सीसीटीव्ही बघत होते की बाहेर नेमकं काय घडतंय. त्यानंतर गणपत गायकवाड यांचा कार्यकर्ता बाहेर जातो. नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक केबिनच्या बाहेर जातात.
केबिनच्या बाहेर थोडासा आरडाओरड सुरु होता. राहुल पाटील हे दरवाज्याजवळ जावून बाहेर डोकावून पाहतात. त्यानंतर ते परत केबिनमध्ये येऊन बसतात. फक्त चारच जण केबिनमध्ये होते. यावेळी गणपत गायकवाड अचानक उठले आणि त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार सुरु केला. अनिल जगताप गोळीबाराचा आवाज ऐकून आत आले. त्यांनी गणपत गायकवाड यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर कार्यकर्ते आतमध्ये शिरले. गणपत गायकवाड यांचा बॉडीगार्ड आला. यावेळी पोलिसांनी गणपत गायकवाड यांना पकडून धरलं.