अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा, पण अजित पवार यांची गैरहजेरी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. पण या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते, अशीदेखील माहिती मिळत आहे.
मुंबई | 23 मार्च 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने मुंबईत आले आहेत. त्यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर वांद्र्याला गेले. तिथे त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते लालबागला आले. त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लागबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आले. त्यांनी ‘वर्षा’ येथील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी आले.
अमित शाह यांनी ‘सागर’ बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या बंद दाराआड काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार है गैरहजर होते. अजित पवार सध्या त्यांच्या नियोजित बारामती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते मुंबईत अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान बैठकीत हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
बंद दाराआडच्या चर्चेत काय ठरलं?
अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांच्यात ‘सागर’ बंगल्यावर 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोमवारपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरु होणार आहे. याबाबत या बैठकीत रणनीती ठरल्याची माहिती समोर आलीय. तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत महत्त्वाची चर्चा पार पडली आहे.
‘सागर’ बंगल्यावर इतर भाजप आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तीनही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे या चर्चेचे परिणाम लवकरच राजकारणात दिसतील, अशी माहीती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, सागर बंगल्यावरील बैठक आटोपल्यानंतर हे तीनही प्रमुख नेते सह्याद्री अतिथीगृहावर आले.
‘सह्याद्री’वरही बंद दाराआड चर्चा
विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावरही अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा झाली. सत्ताधारी तीन पक्षांमध्ये कसा समन्वय आहे, याचा आढावा अमित शाह यांनी यावेळी घेतला. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, लोकसभा निवडणूक यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच लवकरच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे कार्यक्रम घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.