Ravi Rana In Mumbai : नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा बोलून दाखवण्याचं आव्हान; पण रवी राणांना चार ओळी आल्या नाहीत
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणारच असं स्पष्ट केलं आहे.
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana)यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणारच असं स्पष्ट केलं आहे. यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसाच्या चार ओळी वाचून दाखवण्याचं आव्हान दिलं. मात्र, पत्रकारांनी रवी राणा यांना हनुमान चालिसाच्या (hanuman chalisa) चार ओळी बोलण्यास सांगितल्यावर त्यांना बोलताही आल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्याची भाषा करणारे रवी राणा यांना स्वत: चार ओळी वाचता न आल्याने पत्रकारांनाही आश्चर्य वाटलं. पत्रकारही एकमेकांकडे पाहू लागले. मात्र, तरीही रवी राणा यांनी शिवसेनेवरचा हल्लाबोल सुरूच ठेवला. नाही म्हणायला नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाच्या काही ओळी बोलून दाखवल्या. बाळसााहेबांच्या विचाराचे सैनिक असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी हनुमान चालिसा वाचू दिला असता. महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत. समस्त हिंदू हे पाहत आहेत, अशी टीका रवी राणा यांनी केली.
ज्यांना आम्ही मुंबईत आलोय हे माहीत नाही. ज्यांनी अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मुंबईला पाय ठेवून दाखवा असं आव्हान मला दिलं होतं. मी मुंबईत पायच ठेवला नाही. तर जिवंत उभा आहे. हनुमा चालिसा वाचण्यासाठी अशा धमक्या मिळत असेल तर एक नाही शंभर वेळा धमक्या सहन करू पण आम्ही हनुमान चालिसा वाचणारच. शिवसेना भाजपमुळेच सत्तेत आहे. मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. आमच्यावर भाजपचं खापर फोडू नये. आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत, असं रवी राणा म्हणाले.
ते बाळासाहेबांचे विचार विसरले
मुख्यमंत्र्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा वाचला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. पण ते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. महाराष्ट्रावर अनेक संकट आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून संकट आलं आहे. महाराष्ट्रावरील विघ्न हटवण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Video :Navneet Rana यांना Hanuman Chalisa येते का? पहा व्हिडीओ – Tv9#hanumanchalisa #navneetrana #ravirana pic.twitter.com/dd776eoQjq
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2022
हनुमान चालिसा वाचणारच
आम्ही कोणत्याही परिस्थितीत हनुमान चालिसा वाचणारच आहोत. आम्ही सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार आहोत. कायदा सुव्यवस्थेचं पालन करणार आहोत. पोलिसांना सहकार्य करू. बाळासाहेब असते तर एकदा नाही शंभरवेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती. मी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण या सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली. मला मातोश्रीवर जाताना अटक केली. तुरुंगात टाकलं. मला आजही अमरावतीत बंदी करण्यात येणार होतं. तसे आदेश होते. सरकार तुमचे आहे. तुम्ही आम्हाला आत टाकाल. जय श्रीराम आणि बजरंग बलीचं नाव घेण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आम्ही गोंधळ करणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की तुम्ही येऊ नका, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या: