Andheri Accident: अंधेरीच्या नाल्यात कोसळलेल्या कारमधून कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांची थरारक सुटका! पाचही जणांना वाचवण्यात यश
अंधेरी-एमआयडीसी परिसरात असलेल्या कॉल सेंटरची कार (Call center car accident) पश्चिम उपनगरातील कामगारांना कामाची वेळ संपवून घरी सोडण्यासाठी जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
Andheri Accident: अंधेरी मेट्रोच्या मोगरा नाल्यात (Mogra Nala) कार कोसळून अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली. कार पडल्यानंतर चार बीपीओ कर्मचारी आणि वाहन चालकाला वाचवण्यात यश आले आहे. अपघातानंतर सुमारे पाच तासांनी अपघातग्रस्त कारला सकाळी 9 च्या सुमारास नाल्यातून बाहेर काढण्यात यश आले. प्रभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार. मुसळधार पावसानंतर पाणी साचल्याने अंधेरी मेट्रो मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. अंधेरी-एमआयडीसी परिसरात असलेल्या कॉल सेंटरची कार (Call center car accident) पश्चिम उपनगरातील कामगारांना कामाची वेळ संपवून घरी सोडण्यासाठी जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी दोन महिला आणि तीन पुरुष असे पाचही जण या गंभीर अपघातातून थोडक्यात बचावले गेले. डीएन नगर पोलिस व्हॅन क्रमांक 1 ला परिसरातील एका गॅरेज मालकाकडून अपघाताची माहिती मिळाली आणि काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मदत मिळण्यास विलंब झाला असता तर यात जीवित हानीची मोठी शक्यता होती असे प्रत्यदर्शींनी सांगितले. अपघातग्रस्तांना बाहेर काढल्यानंतर त्यांना मानसिक धक्का बसला आहे. या सर्वांचे समुपदेशन करून त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तपासणीनंतर डिस्चार्ज देण्यात आला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. डीएन नगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
मुसळधार पावसामुळे अपघाताची शक्यता वाढली
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे परिसरातले नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहे. परिणामी शहातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे रत्यावरचे गड्डे अदृश्य झाल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. अशातच अनेक ठिकाणी सत्याची कामं अर्धवट झालेली आहे तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य विखुरलेले असल्याने हे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.