मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत आज किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. परब यांनी किरीट सोमय्या यांच्यासह म्हाडाच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींकेड पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. किरीट सोमय्या यांनी म्हाडाची जमीन हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी परब यांना म्हाडाची नोटीसदेखील गेली होती. पण नंतर म्हाडाने ती नोटीस मागे घेतली होती.
या सगळ्या प्रकारामुळे आपली नाहक बदनामी झाल्याचं अनिल परब म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलाय. आपला हक्कभंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीकडे पाठवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे विशेष हक्क समिती आता या प्रकरणात चौकशी करुन काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“महाराष्ट्र विधान परिषद नियम 241 अन्वये मी विशेष हक्कभंगाची सूचना देतोय. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद भूरीकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना देत आहे. संबंधित प्रकरण आपण पुढील चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडे पाठवावे, अशी विनंती करतो”, असं अनिल परब विधान परिषदेत म्हणाले.
“वांद्रे येथील गांधीनगर इमारत 57 आणि 58 या दोन इमारतीमधील मोकळ्या जागेवर मी अनधिकृत बांधकाम करुन मी कार्यालयाचा वापर करुन बेकायदेशीर कामे करण्यासाठी करत असल्याचा आरोप विलास हेगले यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाकडे विभागाला दिली होती. तसेच सदर अनधिकृत बांधकाम तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी केली होती”, असं अनिल परब यांनी सविस्तर सांगितलं.
“या तक्रारीच्या अनुषंगाने म्हाडाने मला अनधिकृत बांधकाम हटविण्याचे सूचित केले. सदर घटनेबाबत माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली. याशिवाय किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनधिकृत जागेची जमीन बळकावल्याचा आरोप करुन लोकायुक्तांकडे तक्रार केली. सदर जागा माझ्या नावावर नसल्याचं तपासातून समोर आलं. म्हाडाने नंतर नोटीसा माग्या घेतल्या. त्यामुळे माझी नाहक बदनामी झाली. लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिमा मलिन करण्याचं काम किरीट सोमय्या यांनी केलं. मी माजी मंत्री असताना म्हाडाने आधी शाहनिशा करणं अपेक्षित होतं”, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
“सोसायटीने परवानगी दिल्यानंतर मी तिथे शेडमध्ये कार्यालय म्हणून काम करत होतो. मी लोकप्रतिनिधी म्हणून तिथे बसत होतो. किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन म्हाडाचा प्लॉट हडपला असा आरोप करत नाहक बदनामी केली”, असं अनिल परब म्हणाले.