Vinayak Mete : विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांना भाजपानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे, अंकुश काकडेंची मागणी
विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्यानंतर किमान त्यांच्या पत्नीला तरी संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना भाजपाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde) यांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला संधी मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्यानंतर किमान त्यांच्या पत्नीला तरी संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसंग्रमानचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाल्याची घटना 14 ऑगस्टला घडली होती. खोपली इथल्या बोगद्याजवळ हा अपघात घडला होता. आज पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी हा अपघात झाला होता. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मराठा आरक्षणासाठी प्रयत्न
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सातत्याने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका आक्रमकपणे मांडली. ज्यादिवशी त्यांचा अपघात झाला, त्यावेळीही ते मराठा संघटनांच्या बैठकीला जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली होती. रात्रभर प्रवास करून ते मुंबईजवळ पोहोचले होते. मात्र मार्गातच त्यांना काळाने गाठले. त्यांच्या राजकीय तसेच सामाजिक कार्याचा आढावा अंकुश काकडे यांनी घेतला. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. ज्योती मेटे यांना भाजपाने विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी अंकुश काकडे यांनी केली आहे.
‘युतीतील घटकपक्ष’
राज्यपालांच्या कोट्यातून ही संधी ज्योती मेटे यांना देण्यात यावी, असे अंकुश काकडे म्हणाले. शिवसंग्राम पक्ष हा भाजपाच्या जवळचा किंवा त्यांच्या युतीतील एक घटक पक्ष आहे. त्यामुळे भाजपाने पुढाकार घेऊन विनायक मेटे यांच्यानंतर त्यांच्या पत्नीला ही संधी द्यावी, असे अंकुश काकडे म्हणाले. रविवारी म्हणजेच (14 ऑगस्ट) दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणाबाबत मुंबई येथे बैठक असल्याने मेटे, त्यांचे सुरक्षारक्षक आणि त्यांच्या गाडीचा चालक हे बीडहून रात्री 11:30च्या दरम्यान मुंबईकडे रवाना झाले होते. खोपोलीजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.