….तर त्यांनी काँग्रेसच्या पेकाटात लाथ घालावी : शेलार
"मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे", असा दावा शेलार यांनी केला (Ashish Shelar slams Congress and Shivsena).
सिंधुदुर्ग : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते. “शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती आहे”, असा दावा शेलार यांनी केला (Ashish Shelar slams Congress and Shivsena).
“शिवसेनेची भूमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे. मात्र या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचं काम शिवसेना करतेय. भाजपला मुंबईचं विभाजन, त्रिभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत. अशा पद्धतीने मुंबईचं विभाजन काँग्रेस आणि त्याला मुक संमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता त्यांना स्वीकारणार नाही. भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल”, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
राज्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यापासून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुनही शेलार यांनी टीका केली (Ashish Shelar slams Congress and Shivsena).
“पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हे अपेक्षित आहे. याच भूमिकेतून जर राज्य सरकारचा निर्णय असेल तर त्यावर टीका उगाच करावी, अशी आमची इच्छा नाही. मात्र ज्या पद्धतीने त्या यादीमधे भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचं वर्णन करायचं तर असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे”, असा टोला त्यांनी लगावला.
“हे सरकार असुरक्षित मनोवृत्तीत काम करतंय. त्यामुळे अजून एक चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही वैज्ञानिक किंवा अभ्यासाच्या दृष्टीकोणातून न घेता राजकीय दृष्टीकोणातून घेण्यात आला आहे”, असंदेखील आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचा : शिवसेनेची ‘स्नॅक्स डिप्लोमसी’; गुजराती मतांसाठी मेळाव्यात वडापाव-जिलेबी, फाफडाची फोडणी!