Hasan Mushrif Ed raid : शिवसेना, राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेसच्या बड्या नेत्याचा नंबर; सोमय्या नाव घेत म्हणाले, तयारी करून ठेवा
सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर कधी कारवाई होणार? कोणत्या यंत्रणेकडून होणार? आणि कोणत्या घोटाळ्या प्रकरणी वा विषयाप्रकरणी होणार हे काही सांगितलेलं नाही. त्यामुळे कारवाई होणार तर कशा संदर्भात होणार?
मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ईडी आणि आयकर विभागाने मिळून मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडी आणि आयकर विभागाने एकत्रित धाडी मारल्याने खळबळ उडाली आहे. या धाडसत्राचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केलं आहे. सोमय्या एवढ्यावरच थांबले नाहीत तर यापुढे कोणत्या नेत्यावर कारवाई होणार आहे त्याचं नावही सांगितलं आहे. सोमय्या यांनी पुढची कारवाई काँग्रेस नेत्यावर होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अस्लम शेख यांचं नाव घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सर्व घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे काढणार. पुढे अस्लम शेख यांनी तयारी करून ठेवायची आहे, असा इशाराच किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी अस्लम शेख यांचं नाव घेतल्याने अस्लम शेख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर कधी कारवाई होणार? कोणत्या यंत्रणेकडून होणार? आणि कोणत्या घोटाळ्या प्रकरणी वा विषयाप्रकरणी होणार हे काही सांगितलेलं नाही. त्यामुळे कारवाई होणार तर कशा संदर्भात होणार? याविषयीचं कुतुहूल निर्माण झालं आहे.
माजी उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतु शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. आणि उद्धव ठाकरे यांची तर प्रचंड मेहरबानी होती. फक्त घोटाळे करणं एवढंच या सरकारचं काम होतं असं सांगतानाच हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं होतं. त्याची चौकशी सुरू झाली आहे. हिसाब तर घेणारच आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर आज सकाळी साडे सहा वाजता छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे कागलमधील वातावरण तापलं आहे. या कारवाईची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच मुश्रीफ यांच्या घरात घुसण्याचा या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून त्यांना पांगवावे लागले.
त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे कागलमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागवली जात आहे.