वाय दर्जाची सुरक्षा असतानाही बाबा सिद्दिकी यांची हत्या; कशी असते ही सुरक्षा?
वाय दर्जाची सुरक्षा असतानाही बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येच्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
वाय दर्जाची सुरक्षा असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंधरा दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. या वाय दर्जाच्या सुरक्षेत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो आणि कोणाला ही सुरक्षा दिली जाते, हे जाणून घेऊयात..
काय असते वाय दर्जाची सुरक्षा?
भारत सरकारकडून अशा लोकांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते, ज्यांच्या जीवाला धोका असतो. हे सुरक्षा कव्हरचं चौथं स्तर आहे. यात 11 लोकांचा समावेश असतो. त्यापैकी एक ते दोन पोलीस अधिकारी सहभागी असतात. यात दोन पीएसओसुद्धा असतात, जे खासगी सुरक्षारक्षक असतात. बहुतांश प्रकरणांमुळे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) किंवा राज्य पोलिसांच्या लोकांवर वाय ग्रुपमध्ये सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. यात एक कारचाही समावेश असतो, ज्यामध्ये सर्व सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध असतात. ज्येष्ठ सरकारी नेते, न्यायाधीश आणि इतर लोक ज्यांच्या जीवाला धोका असतो, अशांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. या दर्जाची सुरक्षा ही जिवाला धोका असणारे प्रसिद्ध सेलिब्रिटी, व्यावसायिक आणि पत्रकारांनाही दिली जाऊ शकते.
सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढत असलेल्या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच रात्री उशिरापर्यंत लिलावती रुग्णालयात नेते, कलाकार यांची रीघ लागली होती.
वांद्रे इथल्या एका झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून सिद्दिकी यांचे काही वाद होते, असं समजतंय. मात्र हत्येमागील नेमकं कारण समजू शकलेलं नाही. सिद्दिकी हे आपल्या आमदार पुत्राच्या कार्यालयाबाहेर आले असताना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघांपैकी दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी सिद्दिकी यांच्या छातीत लागल्याचं समजतंय. या गोळीबारात सिद्दिकी यांच्याबरोबर असलेली एक व्यक्ती जखमी झाली. हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.