‘बेस्ट निर्णय’! आता वाहकानंतर बेस्टमध्ये चालक म्हणून संधी, मुंबईच्या दुसऱ्या लाईफलाईनचे स्टेअरिंग महिलांच्या हाती
बेस्टमध्ये महिलांना वाहक म्हणून संधी देण्यात आली होती. वाहकानंतर आता बेस्ट बसचे स्टेअरिंग देखील लवकरच महिलांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. मुंबईमध्ये बेस्ट बस चालक म्हणून तीन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. महिला प्रत्येक आव्हानात्मक कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा येणार आहे. बेस्टला (Best) मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन म्हणूण ओळखले जाते आणी आता या सेकण्ड लाईफलाईन (Lifeline) असलेल्या बेस्टचे स्टेअरिंग महिलांच्या हाती येणार आहे. लक्ष्मी जाधव (Lakshmi Jadhav) वय 42 या महिला चालक म्हणून बेस्टच्या सेवेत कंत्राटी तत्त्वावर रुजू होणार आहेत. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण पूर्ण होताच त्या मुंबईतील रस्त्यावरून बेस्ट बस चालवताना दिसणार आहेत. खरतर मुंबईच्या रस्त्यावरून दुचाकी चालवने देखील मोठे आव्हानात्मक काम असते. मात्र आता एक महिला मुंबई सारख्या शहरात ट्राफिक असलेल्या रस्त्यांवरून बस चालवताना दिसणार आहे.
बेस्टमध्ये 18 हजार कर्मचारी
बेस्टच्या ताफ्यात सध्या एकूण 3 हजार 500 वाहने आहेत. त्यापैकी काही वाहने ही महापालिकेच्या मालिकीची असून, काही वाहने ही भाडे करारावर घेण्यात आली आहेत. भाडेकरारावर ज्या बस घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चालक संबंधित कंपनीचा तर वाहक बेस्टचा आहे. बेस्टमध्ये सध्या स्थितीत सुमारे 18 हजार कर्मचारी काम करतात. त्यामध्ये 9 हजार वाहक तर 9 हजार चालक आहेत. बेस्टमध्ये आतापर्यंत पुरुषांचीच मक्तेदारी होती. मात्र आता महिलांना देखील सधी मिळत आहे. बेस्टमध्ये 100 महिला आतापर्यंत वाहक म्हणून रूजू झाल्या आहेत.
सुरुवातीला तीन महिला चालक
दरम्यान आता वाहकपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यानंतर महिला बेस्टच्या चालकाची जबाबदारी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. भाडेतत्त्वावरील बसवर कंत्राटी चालक म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे. सुरुवातीला तीन महिला बेस्टमध्ये चालक म्हणून रुजू होणार आहेत. सध्या त्यांचे प्रशिक्ष सुरू असल्याची माहिती बेस्टच्या वतीने देण्यात आली आहे. त्यातीलच एक महिला चालक आहेत लक्ष्मी जाधव या, त्या लवकरच बेस्टच्या सेवेत चालक म्हणून रूजू होणार आहेत. त्या बेस्टच्या पहिल्या महिला चालक असतील. यानंतर हळूहळू ही संख्या वाढवण्यात येणार आहे. 27 किंवा 28 मे रोजी चालक लक्ष्मी जाधव या धारावी डेपो ते दक्षिण मुंबईदरम्यान बस चालवणार आहेत.