सावधान ! अखेर नको तो आदेश आलाच, घराबाहेर पडताना मास्क लावाच, मार्गदर्शक तत्त्वेही जारी करणार
महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल. सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावावा, लवकरच गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी करणार...
मुंबई : संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने देशात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाचे निर्बध आणि मास्क सक्ती हे सामान्य माणसाला नकोसे वाटणारे निर्बंध पुन्हा एकदा जारी केले जाणार आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड चाचण्या, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू आणि औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता इत्यादी सर्व कोविड वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व महापालिका आणि खासगी रुग्णालयांनी कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना केली.
मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त चहल यांनी आढावा बैठक घेतली. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
रुग्णालय कर्मचारी, रूग्ण, अभ्यागतांना मास्क सक्ती
६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र, महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल. सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावावा, लवकरच गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत मास्क सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करणार आहे. येत्या मे महिन्यामध्ये रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता रुग्णालयांमध्ये रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे. तसेच, ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स, औषधसाठा आणि इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करावी असे आदेश त्यांनी दिले.
कोविड बाधित रूग्ण वेळीच शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी, अतिदक्षता उपचारांची आवश्यकता वाढू शकते त्यासाठी ऑक्सिजन प्लांट सुस्थितीत कार्यरत करावेत. सर्व विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) यांच्या कामकाजाचा तातडीने फेरआढावा घ्यावा. आवश्यक ते सर्व मनुष्यबळ आणि यंत्रणा कार्यरत करावी या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा
सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सक्ती नाही. मात्र, त्यांचा जनतेशी संपर्क येत असल्यामुळे मास्कचा उपयोग करावा. तसेच, पालिका कार्यालयांमध्ये येणाऱ्यांना मास्क लावण्याची विनंती करावी, असे आयुक्त म्हणाले.