मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काल राजभवनात निरोप देण्यात आला. राज्यपाल कोश्यारी आता आपल्या घरी परतणार आहेत. केंद्र सरकारने त्यांना अजून कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे कोश्यारी यांचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही? याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मात्र, या चर्चा सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपवर मेहरबानी दाखवली आहे. तर शिंदे गटाला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या पदावरून पायउतार होतानाही शिंदे गटाला ठेंगा दाखवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची दहावी जागा रिक्त होती. या जागेवर राज्यपाल कोश्यारी यांनी भाजप गटातील व्यक्तीची वर्णी लावली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या परिचयातील प्रभादेवीतली धनेश सावंत यांची राज्यपाल निर्देशित सिनेट सदस्यपदी वर्णी लागली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशाच्या नियुक्तीचे हे पत्र 3 फेब्रुवारी रोजीच निघालं आहे. राज्यपालांनी मुंबई विद्यापीठ नामनिर्देशित सदस्यांच्या 10 पैकी 9 जागांवर भाजपशी संबंधित सदस्यांची अलीकडेच वर्णी लावली होती.
यापैकी शिल्लक राहिलेल्या एका जागेवर शिंदे गटातील सदस्यांची नियुक्ती होईल अशी अपेक्षा होती. मात्र, राज्यपालांनी सदस्य नियुक्तीत भाजपला झुकतं माप दिल्याचं दिसून आलं आहे. जाता जाता भाजपने शिंदे गटालाही ठेंगा दाखवल्याने आता त्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काल राजभवन येथे भावपूर्ण निरोप दिला. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.
राज्यपाल कोश्यारी यांना आज नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज आपल्या गावी परतणार आहेत. तर शनिवारी 18 तारखेला नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होणार आहे.