Sanjay Shirsat Controversial Statement | महायुतीत धुसफूस, संजय शिरसाट यांना समज दिली जाणार
शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं. त्यांचं हेच वक्तव्य आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्यांना आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून समज दिली जाणार असल्याची माहिती समोर आलीय. राज्यात सत्तांतर होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय. सत्तेत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचादेखील गट सहभागी झालाय. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, अशा चर्चांना सातत्याने उधाण येत असतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी राज्यातील भाजप नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अशी सगळी राज्यातली राजकीय स्थिती असताना संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय शिरसाट यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना संबंधित वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांनी पुढचे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहावं, तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील काही नेते नाराज झाल्याची माहिती समोर आलीय. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मानणारे नेते आणि भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांना त्यांच्या वक्तव्यावरुन समज दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
नेमकी काय कारवाई केली जाणार?
महायुतीची समन्वय समिती होईल तेव्हा संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला जाईल. महायुतीच्या समन्वय समितीत नेमकी काय भूमिका मांडावी यावर चर्चा होणार आहे. कारण मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना नेते आपलाच नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, अशी वक्तव्ये करताना दिसत आहेत. त्यामुळे समन्वयाचा अभाव आहे का? असा चुकीचा मेसेज जनतेत जाताना दिसतोय. त्यामुळे नेमकं मत काय मांडावं, याबाबतच्या सूचना तीनही सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांना देण्यात येतील.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
“मी याआधीही सांगितलंय की, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता असतो तो आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला मुख्यमंत्री होऊ पाहू इच्छितो. अजित पवार यांच्याबाबतही तसंच आहे. काही लोकं अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही तसंच आहे. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याबाबत स्पष्ट केलं. ते म्हणतात त्यात काही गैर नाही. आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत. पण एक लक्षात ठेवा, माझी सुद्धा इच्छा आहे. एकनाथ शिंदे हेच पुढे मुख्यमंत्री राहावेत आणि देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करतात. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं”, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.
संजय शिरसाट यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस आधी हसले. त्यानंतर त्यांनी ठीक आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.