Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्या यांच्या ‘त्या’ व्हिडीओची राज्य महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या…
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जोडो मारत आंदोलन करत तीव्र निषेध केला जात आहे. अशातच आता या व्हायरल व्हिडीओची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कायम विरोधी पक्षातील नेत्यांवर बेधडकपणे आरोप करणाऱ्या सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. सोमय्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जोडो मारत आंदोलन करत तीव्र निषेध केला जात आहे. अशातच आता या व्हायरल व्हिडीओची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना सूचना केल्या आहेत. घटनेचा वस्तुस्थिती अहवाल सादर करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसारित झाला. त्यानंतर राज्यभरातून अनेक सामाजिक संस्थांनी विचारणा केली. राज्य महिला आयोगाने या व्हिडीओची दखल घेत मुंबई पोलीस आय़ुक्तांना पत्र पाठवत या घटनेचा तपास करत वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. जर पीडित महिलांनी येऊन तक्रारी दाखल केली तर आपण कारवाई करत असल्याचंही चाकणकरांनी सांगितलं.
किरीट सोमय्यांचं स्पष्टीकरण?
किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. “मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या जातायेत. त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्यांनी याआधी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षामधील नेत्यांविरोधात पुरावे सादर करत त्यांना लवकरच तूरूंगात पाठवणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आता शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपसोबत असल्याने सोमय्यांची गोची झालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ज्या नेत्यांची नाव घेत त्यांना आपण जेलमध्ये टाकणार असल्याचं सोमय्या सांगत होते. यामधील काही नेते आता भाजपसोबत सत्तेत असल्याने सोमय्यांवरच निशाणा साधताना दिसत आहे.