‘महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना महाविकासआघाडी सरकारकडून राजाश्रय, अनेकजण गुन्हे दाखल होऊन मोकळे फिरतायत’
Chitra Wagh | या महिलेवर ज्याप्रकारे अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आले आहेत, तिला ज्याप्रकारे मारण्यात आलं आहे, ते पाहता हे एका माणसाचं काम असेल असं वाटत नाही. तिने हे अत्याचार कसे सहन केले असतील याची कल्पना करवत नाही. या महिलेच्या गुप्तांगात लोखंडाची सळई टाकण्यात आली.
मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार पहिल्या दिवसापासून महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना राजाश्रय देत आहे. अशा लोकांवर गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हे दाखल झाले तरी महिलांवर अत्याचार करणारे लोक राजरोसपणे बाहेर फिरत आहेत. त्यामुळे विकृतांचे मनोबल वाढत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे कधीही निघाले नव्हते, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा शनिवारी राजावाडी रुग्णालायत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर चित्रा वाघ यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारने राज्यातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. या महिलेवर ज्याप्रकारे अमानुष पद्धतीने अत्याचार करण्यात आले आहेत, तिला ज्याप्रकारे मारण्यात आलं आहे, ते पाहता हे एका माणसाचं काम असेल असं वाटत नाही. तिने हे अत्याचार कसे सहन केले असतील याची कल्पना करवत नाही. या महिलेच्या गुप्तांगात लोखंडाची सळई टाकण्यात आली. त्यामुळे महिलेच्या पोटातील आतडीही कापली गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आम्ही घोषणा आणि भाषणांपलीकडे काहीच करु शकत नाही. राज्य सरकारसाठी ही घटना म्हणजे आणखी एका गुन्ह्याची नोंद यापलीकडे काही नाही. महाराष्ट्रातील लेकीबाळींचे लचके तोडले जात आहेत. त्यावर कोणीही काहीही बोलायला तयार नाही. सरकारला याची लाज वाटली पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
यशोमती ठाकुरांवर पलटवार
या घटनेवरून भाजपच्या नेत्यांवर राजकारणाचा आरोप करणाऱ्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांना चित्रा वाघ यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही या घटनेवरुन प्रश्न विचारले तर यशोमती ठाकूर दिल्लीत आणि हाथरसमध्ये तुम्ही काय केले, असा प्रश्न विचारतात. राज्याची महिला आणि बालविकासमंत्री अशाप्रकारे विचार करते, याची मला लाज वाटते. तुम्ही महिला आयोगाला साधा अध्यक्ष देऊ शकला नाहीत आणि आम्हाला दिल्ली व हाथरसमधील घटनांवर जाब विचारत आहात. मात्र, आम्ही तुम्हाला राज्यात महिलांवर होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराविषयी प्रश्न विचारतच राहणार, असे चित्रा वाघ यांनी ठणकावून सांगितले.
चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या
मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या अक्षरश: ढसाढसा रडल्या. त्यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अश्रू रोखता आले नाहीत.
संबंधित बातम्या
Mumbai Sakinak Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त प्रतिक्रिया