भाजप नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांचा ‘दम’ काढला? म्हणाला, ‘मणिपूर काय करता ? तुम्ही तर…’
उध्दव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत. अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा असे ते म्हणतात. काहीच करायचं नाही आणि मोदीजींना सल्ला द्यायला निघाले, अशा शब्दांत भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील राज्य पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान अमेरिकेत काय जाता? मणिपूरला जा, असा सल्ला दिला. त्यावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. उध्दव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत. अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा असे ते म्हणतात. काहीच करायचं नाही आणि मोदीजींना सल्ला द्यायला निघाले, अशा शब्दांत भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. तुम्हाला मुंबईच्या मालवणीत ही जायला जमत नाही त्यामुळे तुम्ही मोदींना सल्ला देऊ नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून दादर येथे महिलांसाठी सहकार संस्था प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी सहकारी संस्थांची नोंदणी कशी करावी, स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन कसे करावेत, रेकॉर्ड कसे लिहावे. कोणते प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, उद्योजकता विकास कसा साधावा याबाबत या प्रशिक्षण शिबिरात माहिती देण्यात आली.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात बोलताना भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरी बसून कारभार करत होते. स्वतः घरातून बाहेर पडायचं नाही. पडला तर थेट विमानातून लंडनला जायचं… तिथून मुंबईकरांची चिंता करायची म्हणजे काय? तर काहीच करायचं नाही अशा टीका शेलार यांनी केली.
मणिपूर सोडा तुम्ही कधी मुंबईच्या मालवणीतला तरी गेला होता काय…? तुम्हाला मुंबईच्या मालवणीत ही जायला जमत नाही. त्यामुळे तुम्ही मोदींना सल्ला देऊ नका. भाजप मणिपूर तर शांत करून दाखवेलच आणि मालवणीमध्ये वळवळ करणारी हिरवी चळवळही भारतीय जनता पार्टीच शांत करेल. उद्धवजी तुमच्या गटात तो दम नाही, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.
समान नागरी कायद्याला तुम्ही समर्थन दिले ते बरं झालं. तोंड देखलं का होईना उबाठाने समर्थन दिले. पण, कृषी कायद्याचे समर्थन करतो असे सभागृहात म्हणालात. मात्र, बाहेर आल्यावर आणि जनतेत गेल्यावर युटर्न घेतला. युटर्नचा आजकाल दुसरा अर्थ म्हणजे उद्धव ठाकरे असे लोक बोलू लागलेत. त्यामुळे तुम्ही समान नागरी कायद्याला समर्थन बोलून दाखवले आहे. पण, याच्यावर ना जनतेचा विश्वास आहे, ना आमचा विश्वास आहे, असे आमदार आशिष शेलार म्हणाले.
खोटं बोलणाऱ्यांच पीक वाढलंय आहे. काळं म्हटलं की सफेद का नाही? सफेद म्हटलं की पिवळ का नाही? पिवळा म्हटलं तर लाल का नाही? असं विचारायचे उद्योग सुरु आहेत. आजूबाजूला विरोधकांचा खोटा प्रचार सुरु आहे त्याकडे लक्ष द्यावे लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.