धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर सुरेश धस यांनी या भेटीमागचं कारण देखील सांगितलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत या प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. पण सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या विषयावर भाष्य केलं नाही. आपण बीडमधील काही पतसंस्थांनी 16 लाख गुंतवणूकदारांचे नुकसान केले, त्यांची तक्रार करण्यासाठी आणि त्यावर मार्ग निघावा या उद्देशाने अजित पवार यांच्या भेटीसाठी आलो होते, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
“ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह युनियन, तसेच परळीची एक बँक आहे, राजस्थानी मल्टिस्टेट, जिजाऊ मल्टिस्टेट आणि इतर मल्टिस्टेटमधून 16 लाख सभासद हे मराठवाड्यातील आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातील सव्वा लाख सभासद आहेत. जामखेड या गावी शाखा होती. तिथलेदेखील मोठ्या प्रमाणात सभासद आहेत, ज्यांचे पैसे बुडाले आहेत. या प्रकरणात मार्ग काढला पाहिजे, केंद्र सरकारशी बोललं पाहिजे आणि एक बैठक लावली पाहिजे या मागण्या घेऊन मी इथे आलो”, असं सुरेश धस यांनी सांगितलं.
“जवळपास 26 लोकांच्या आत्महत्या या प्रकरणात झालेल्या आहेत. बीडमधील एक युवक बिंदूसरा तलावामध्ये स्वत: बळी पडला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने बैठक घ्यावी”, अशी विनंती करण्यासाठी अजित पवार यांच्या भेटीसाठी आलो होतो, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं. या सर्व पतसंस्थांच्या घोटाळ्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा काही सहभाग आहे का? असा प्रश्न सुरेश धस यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं.
…म्हणून या भेटीला जास्त महत्त्व
सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्षांचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यपालांच्या भेटीला गेले तेव्हा सुरेश धस हे देखील त्यांच्यासोबत गेले होते. तसेच त्यानंतर धनंजय मुंडे यांनी काल मंत्रालयात जावून अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. त्यानंतर लगेच रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. या सर्व घडामोडींनंतर आता अजित पवार आणि सुरेश धस यांच्या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. आता ते या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा आरोप करतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.