Madhuri Dixit | माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार? भाजप खासदार म्हणाले….
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मुंबईत लोकसभेची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर आता खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढणार आहे. ती खासदार गोपाल शेट्टी किंवा खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जावून तिथल्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बैठक पार पडली होती. या बैठकीत माधुरी दीक्षित हिच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या वृत्तावर आता खासदार गोपाल शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिलीय.
गोपाल शेट्टी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठी माणसावर अन्याय होतो का? या प्रश्नाचं उत्तर दिलं. “भारतीय जनता पक्ष मराठी, गुजराती आणि उत्तर भारतीय असा भेदभाव करत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे गोपाल शेट्टी स्वतः मी आहे. मला 2019 ला ज्या-ज्या लोकांनी मतदान केलं आहे, त्या सर्वांचा मी खासदार आजही आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना होती. पण त्यांच्या शिवसैनिकांनी मला मतदान केलेलं आहे. मी मराठी भाषिकांचे मानसन्मान वाढवण्याचं काम केलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली.
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला एका प्रगतीपथावर नेणारे एक नेतृत्व म्हणून लोकांच्या समोर आलेल्या आहेत. त्यांनी काम करून दाखवलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांची श्रम करणारे एका नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांची ख्याती किती मोठी आहे, त्यांची उंची लक्षात घेऊन लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली पाहिजे”, असं म्हणत गोपाळ शेट्टी यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार?
यावेळी गोपाळ शेट्टी यांना माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. “मला असं वाटतं की, यावर काही भाष्य करणं खूप लवकर होईल. मलापण अनेक जणांचे फोन आले होते. सोशल मीडियावर खूप जोरात बातमी सुरू आहे. पक्ष जे काही निर्णय घेईल, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. मला पक्षाने खूप मोठी संधी मुंबई शहरामध्ये दिली”, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.
“माझ्यावर कधीही निवडणुकीचं तिकीट मागण्याची पाळी आली नाही. मी माझ्या मनाप्रमाणे काम केलं आहे. माझ्यावर पक्षाचे खूप मोठे उपकार आहेत. एखाद्या नवीन चेहऱ्याला आणून जर पक्षाला खूप मोठा लाभ होत असेल तर नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याने पक्षाबरोबर वाटचाल करायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे”, अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली.