मुंबई : राज्याचे माजी उद्योग मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत आपण पक्षप्रवेश करत असल्याचं भूषण देसाई यांनी सांगितलं. थेट सुभाष देसाई यांच्या चिरंजीवानेच पक्षप्रवेश केल्याने हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तर भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. पण शिवसेनेचा हा उत्साह अल्पकाळ टिकण्याची शक्यता आहे. कारण देसाई यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला खुद्द भाजपनेच विरोध केला आहे. भाजपच्या नेत्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या प्रवेशाला विरोध केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला गोरेगाव भाजपने विरोध केला आहे. भाजपचे गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा विरोध दर्शविला आहे. भ्रष्ट व्यक्तीमत्त्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षामध्ये प्रवेश न देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. भूषण सुभाष देसाई हा फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आल्याचा आरोप संदीप जाधव यांचा पत्रातून केला आहे.
भ्रष्ट आणि मलिन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना आहे. आपली युती आहे. मित्राची एक चूक दोन्ही पक्षांना भारी पडू शकते, असा इशाराही या पत्रातून जाधव यांनी दिला आहे. जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे आपल्या भावना कळवून देसाई यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. जाधव हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही आपली नाराजी कळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भाजपच्या या पावित्र्यामुळे गोरेगावमध्ये भाजपकडून भूषण देसाई यांना कोणतंही सहकार्य मिळणार नसल्याची शक्यता आहे. गोरेगावात भाजपचं सर्वाधिक वर्चस्व आहे. तसेच भूषण देसाई हे राजकारणात सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांना मानणारा असा वर्ग नाही. त्यांच्या प्रवेशाने मुंबई तर सोडा गोरेगावातही शिंदे गटाला काहीच फायदा होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात गोरेगावात भूषण देसाई विरुद्ध भाजप असं चित्रं दिसण्याची शक्यता आहे.