2024च्या आधीच भाजपात महाभूकंप होणार?; संजय राऊत यांचा महादावा काय?
2024साठी भाजपकडे कोणताही मुद्दा नाही. महागाई, बेरोजगारी, चीन लडाखमध्ये घुसला आहे. हे मुद्दे आहेत. जम्मू-काश्मीरचा मुद्दा आहे. अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा आहे. कॅनडाचा मुद्दा आहे. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राजकीय वर्तुळात भूकंप घडवून देणारं मोठं विधान केलं आहे. राऊत यांनी थेट भाजप आणि एनडीएचं भवितव्य वर्तवणारं विधान केलं आहे. 2024 पूर्वी भाजपचं काय होणार? एनडीएचं काय होणार? याचा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या विधानावर अनेक राजकीय तर्कवितर्कही लढवले जात आहेत.
खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट भाजप फुटणार असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी निर्माण झाली. त्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली नाही. नंतर इकडून तिकडून लोकं घेतले. बैठक घेतली. शिवसेना आणि अकाली दल नसेल तर एनडीए शून्य आहे. एनडीएची ताकद शिवसेना आणि अकाली दल होती. बाकीचे लोक येतात जातात. एनडीए अस्तित्वातच नाही. ती नौटंकी आहे. एनडीए राहील की नाही माहीत नाही. किंबहूना 2024मध्ये भाजपही फुटलेला असेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अकेला मोदी काफी है बदललं
जेव्हा आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो तेव्हा त्यांना जाग आली. तोपर्यंत अकेला मोदी काफी है हेच चालू होतं. इंडिया निर्माण झाल्यावर मोदी अकेला नही उनके साथ और लोक चाहिए ही भावना जागी झाली. आताची एनडीए ही कमकुवत एनडीए आहे. बाकीचे लोक येत जात राहिले. अजून काही लोक भाजपमधून बाहेर पडतील. एवढंच नव्हे तर भाजपही फुटेल, असं राऊत म्हणाले.
भाजपने ठेका घेतला नाही
यावेळी त्यांनी सनातन धर्माच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सनातन धर्म कोणीही उखडून फेकू शकत नाही. एआयडीएमकेचा मुद्दा सनातन धर्माच्या विरोधात होता. सनातन धर्म जगात राहील. मोदींनी सनातन धर्माची चिंता करू नये. भाजपने सनातन धर्माच्या रक्षणाचा ठेका घेतलेला नाही. शिवसेना बसलेली आहे. भाजपला आतापर्यंत सनातन धर्माची चिंता नव्हती, आता कुठून आली? असा सवाल त्यांनी केला.
भाजपचं अकल्याण होईल
उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये नितिमत्ता असेल तर 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेतील. माझे आमदार जातात, त्यामुळे मी विधीमंडळात बहुमत का सिद्ध करू? माझ्याच लोकांच्या विरोधात आणि सत्तेसाठी मी आटापिटा का करू? असं उद्धव ठाकरे यांना वाटलं. याला नैतिकता म्हणतात. ती ठाकरेकडे होती, आहे. सुधीर मुनगंटीवार यांना ज्या गोष्टीत कल्याण वाटतं, 2024 साली त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे, असंही ते म्हणाले.
आमचा दबाव नाही
यावेळी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. कुणी तरी म्हणाले विधानसभा अध्यक्षांवर आम्ही दबाव आणत आहोत. आम्ही दबाव टाकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. कोर्टाच्या निर्णयावरच आम्ही बोलत आहोत. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदार म्हणून शपथ घेतली आहे. वकिलीची सनद घेताना घटनेची शपथ घेतली आहे.
वर्षभरात त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात घटनेचा आणि कायद्याचा खून होताना दिसत आहे. त्यांना काही वाटत नसेल तर विधीमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासातील पान त्यांच्या नावावर लिहिलं जाईल. बेकायदेशीर सरकार चालवायला समर्थन देत आहे. याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. जनतेत रोष आहे. त्याची किंमत सर्वांना मोजावी लागेल. या कटात जे आहेत त्यांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.