संजय राऊत तुम्ही फडणवीसांच्या घराबाहेर याच आम्ही बघू, भाजपचं राऊतांना थेट आव्हान
संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आणि आत्ता या 3 पक्षातील कोणतेच नेते त्यांच्या समर्थनार्थ बोलत नाही आहेत. दुर्दैव आहे की ते आज एकटे पडले आहेत. ज्या माणसाला स्वतःच पक्षच कोणता हे कळत नाही आहे, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.
मुंबई : संजय राऊत विरुद्ध भाजप (Bjp Vs Shivsena) असा सामना सध्या रंगात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा मागे (ED) लावण्यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आता भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही देवेंद्र फडणवीसच या चौकशी मागे लावण्यातमागे असल्याचे सांगत आरोप केले आहेत. त्याला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आणि आत्ता या 3 पक्षातील कोणतेच नेते त्यांच्या समर्थनार्थ बोलत नाही आहेत. दुर्दैव आहे की ते आज एकटे पडले आहेत. ज्या माणसाला स्वतःच पक्षच कोणता हे कळत नाही आहे, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे. तसेच संजय राऊत तुम्ही फडणवीस साहेब यांच्या घराच्या बाहेर याच आम्ही बघू असं खुलं आव्हानही देऊन टाकलं आहे. 2014 ते 2021 प्रत्येक दिवस आणि इतके वर्ष भाजपच्या विरोधात तुम्ही लिहत आलात. 7 वर्ष तुम्ही भाजपला बदनाम करण्याचं काम करत आहात. गेली 7 वर्ष तुमच्या पाठी ED का लागली नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
पोलिसांची कारवाई पक्षपाती आहे-शेलार
आत्ता कुठे तपास सुरू झाला त्यामुळे तुम्ही ही कोल्हे कुई करत आहात. भाजपच्या विरोधात सातत्याने बोलणारे निवडणुकीत तोंडावर पडले हे कधी बोलणार का? निःपक्षपाती कसला? नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला ते निःपक्षपाती पणे केलं आहे का? नितेश राणे आणि रवी राणा यांच्यावर सुद्धा जे गुन्हे दाखल केले त्यात निःपक्षपाती पणा होता का? हा पक्षपाती पणा आहे, असे अनेक प्रश्न शेलारांनी उपस्थित केले आहेत. तुम्ही पोलिसांचा किती गैर वापर करत आहात ते जनता बघत आहे. निवडणूका या 5 वर्षाच्या पुढे जाणं म्हणजे हा मतदार द्रोह आहे. मुंबईकारांचा हिशोब घेण्याचा अधिकार तुम्ही का हिरावून घेत आहात. या कोरोनाच्या काळात तुम्ही 2 पोटनिवडणुका घेतल्या ना मग मुंबई, पुणे, ठाणे पालिकेची निवडणूक का घेत नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे. तसेच मुंबई महापालिकेवर प्रशासक बसवण्याच्या मागे हा छुपा डाव आहे ही शंका आहे. प्रशासक बसवण्याची भूमिका ही लोकशाहीला मारक आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
पावसाळ्यातल्या पंपावरूनही हल्लाबोल
पावसाळ्यात लावलेल्या पाणी उपसा पंपावरूनही शेलारांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. वरळी आणि कलानगर हीच मुंबई नाही फक्त. कलानगर मध्ये पाणी साचू नये म्हणून 9 पंप लावले. मग बाकीच्या मुंबईत पाणी भरू दे, असे म्हणत त्यांनी आरोप केले आहेत. याचा हिशोब द्या म्हणत आम्ही ही पालिकेची निवडणूक लढवणार आहोत. तसेच उद्धव ठाकरेंना टोला लगावताना डसणाऱ्या सापापेक्षा मोर बरे, असेही शेलार म्हणाले आहेत. हिजाबवरुन आत्ता आंदोलन करत आहेत. याच उत्तर गृहमंत्री देऊ शकणार आहेत का? कारवाई आणि निष्पक्ष कारवाई करणं गृहमंत्र्यांचं काम आहे. हिजाबच्या पाठीमागे कोण राजकारण करत आहे? हे शोधन गरजेचं आहे. डॉलरच्या तुलनेत जेव्हा जेव्हा रुपये वाढतो तेव्हा तेव्हा वातावरण गढूळ करण्याचं काम होत असत, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.