BJP: भाजपाची नजर राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघांवर, श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावरही डोळा? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याचा अर्थ काय?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गट म्हणजेच शिवसेना ही एनडीएचा घटक पक्ष झाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाजपाच्या या 140 मतदारसंघात एनडीएतील घटक पक्षांकडे असलेल्या मतदारसंघांचा समावेश असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही या निमित्ताने कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक बांधणी उत्तम करण्याचा प्रयत्न भाजपा आणि अनुराग ठाकूर यांचा असेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात कल्याण या लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे का, ही चर्चा सुरु झाली आहे.
कल्याण– केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur)हे कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले आहेत. भाजपाने केंद्रीय पातळीवर 140 लोकसभा मतदारसंघ ठरवलेले आहेत. त्या मतदारसंघांकडे केंद्रीय पातळीवर लक्ष देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्याचे हेच निमित्त आहे. या 140 मतदारसंघांत गेल्या वेळी भाजपाला (BJP)जागा मिळवता आलेली नाही. अशा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणी व्हावी, तिथल्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी या मतदारसंघांशी केंद्रीय मंत्री, नेते यांना जोडून देण्यात आलेले आहे. या नेत्यांचे या मतदारसंघांत पुढील दोन वर्षांत किमान 3 ते 4 दौरे होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. याच कार्यक्रमातंर्गत हा अनुराग ठाकूर यांचा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र या निमित्ताने एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपाचाडोळा आहे का, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रातील 16 मतदारसंघांचा समावेश
या 140 मतदारसंघांमध्ये राज्यातील 16 मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहितीही रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. यात कल्याण मतदारसंघ असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत अशाच प्रकारचा दौरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीतही करणार आहेत. त्यामुळे कल्याण आणि बारामती या दोन मतदारसंघांची नावे समोर आली आहे. इतर 14 मतदारसंघ कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र येत्या काळात या 16 ही लोकसभा मतदारसंघात भाजपाचे केंद्रीय मंत्री, नेते प्रवास करतील. त्यावरुन राज्यातील हे 16 मतदारसंघ कोणते, हे स्पष्ट होणार आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावर भाजपाचा डोळा?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गट म्हणजेच शिवसेना ही एनडीएचा घटक पक्ष झाला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाजपाच्या या 140 मतदारसंघात एनडीएतील घटक पक्षांकडे असलेल्या मतदारसंघांचा समावेश असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही या निमित्ताने कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक बांधणी उत्तम करण्याचा प्रयत्न भाजपा आणि अनुराग ठाकूर यांचा असेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात कल्याण या लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे का, ही चर्चा सुरु झाली आहे. या मतदारसंघातील कामांचा पाठपुरावाही अनुराग ठाकूर करणार असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिलेली आहे.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
कल्याणच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी चहापानानातंर मित्राकडून चांगला मोदक मिळाल्याची प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. यावेळी शिंदे यांनीही प्रत्येकाला आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न आणि अधिकार असल्याचे सांगितले. आपण इथले खासदार आहोत आणि 2024 सालीही आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा आणि शिंदे गट एकत्र निवडणुका लढवणार असल्याची घोषणा यापूर्वीच झाली असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.