BMC Elections : मुंबई महापालिकेतील घराणेशाही संपवा, फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Elections 2022) लागत आहेत. या निवडणुकीत तीन दशकांपासून सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) हातून मुंबई महापालिका काढून घेण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उचलला आहे.

मुंबई : काही दिवसातच सोन्याचं अंड देणारी कोंबडी ज्या महापालिकेला बोलतात. त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Elections 2022) लागत आहेत. या निवडणुकीत तीन दशकांपासून सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) हातून मुंबई महापालिका काढून घेण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उचलला आहे. राज्यापुढे घराणेशाहीचे मोठे संकट उभे राहिलेय. पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याने पक्ष चालविणे लोकशाहीला धोकादायक आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असून येणाऱ्या काळात मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्याकरिता आणि प्रायव्हेट लिमिटेड पक्षाला हटविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवारी बोलत होते. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयातील सभागृहात भव्य कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमातून फडणवीसांनी कार्यकर्त्यांना हाक दिलीय. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी हेही नेहमी घराणेशाहीवरून विरोधकांवर निशाणा साधत असतात.
सरकारच्या विरोधात बोलल्यास जेलमध्ये टाकतात
विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, राज्यातील सध्याची परिस्थिती भयानक आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास जेलमध्ये डांबले जाते. घरे तोडली जातात. संस्कृती पायदळी तुडवली जातेय. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. यापुढे महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईतील परिस्थिती विदारक असून मुंबई महापालिकेने कोविड काळात प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला. खऱ्या अर्थाने प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे काय ते महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड केले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यानी त्यावर चकार शब्द उच्चारला नाही. येणाऱ्या काळातील घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष करावा लागणार आहे असे सांगत मुंबई महानगरपालिकेतील घराणेशाहीचा पराभव ठरेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विरोधकांना जोरदार टोलेबाजी
भारतीय जनता पार्टी लोकांची सेवा करत विस्तारत जाणारा पक्ष आहे. मुळातच पक्षाची निर्मिती राष्ट्रवादातून झाली आहे. भाजपा संघर्ष करत जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अनेकवेळा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला पण विचार संपला नाही. पक्षाकडे दोन जागा असताना घाबरलो नाही. आतातर 302 जागा आहेत असा टोला श्री. फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. भारतीय जनता पक्ष समतेचा संदेश देत गरिबाच्या कल्याणासाठी काम करणारा पक्ष असल्याचे सांगून श्री. फडणवीस पुढे म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे आमचं लक्ष्य आहे. केवळ सेक्युलरच्या नावाखाली विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करण्यापेक्षा देशातील गरिबांना सेवा देण्याचे काम भाजपा करत आहे. येणाऱ्या काळात शोषित आणि वंचितांसाठी विकासकामांच्या योजना आणून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवारांची मोदींसोबत 25 मिनिटं भेट, अजित पवारांनी भेटीचं कारण सांगितलं
Sanjay Raut : येड XX आहे तो, अशा XXX स्थान नाही, राऊतांची पुन्हा सोमय्यांना ‘ऑन रेकॉर्ड’ शिवराळ भाषा