BMC Exam : BMC परीक्षेचा पेपर फुटला का? एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा, विषय राज ठाकरेंच्या कोर्टात
BMC Exam : मुंबई महापालिकेच्या गट अ च्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा करण्यात येतोय. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. हा विषय राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा विषय उचलून धरणार असल्याच समजतय.

मुंबई महानगरपालिकेच्या गट ए च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय. “महानगरपालिकेच्या गट ए च्या ज्या परीक्षा होत्या, त्यात साधारणपणे 1200 लोकं बसली होती. जो पेपर 25 तारखेला होणार होता. तो पेपर आधीच 19 तारखेला फुटला. आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्न दहा दहा लाखाला विकला गेला. शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला. घोटाळेबाज असे इंजिनियर तुम्ही पालिकेला देणार आहात का?” असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
“एकदा हे पैसे देऊन इंजिनियर झाले, की नंतर हे पैसे खाण्याचेच काम करतील. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे” असं संदीप देशपांडे म्हणाले. “राज ठाकरे यांना आम्ही पूर्ण प्रकाराची कल्पना दिलेली आहे. लवकरच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन त्या विषयावरती बोलणार आहेत” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.
‘…तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू’
“या घटनेत परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे, आणि जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून रितसर तक्रार देणार आहेत” असं संदीप देशपांडे म्हणाले. “देवेंद्र फडणीस यांच्याकडे आम्ही कारवाईसाठी जाऊ. त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू” असं संदीप देशपांडे म्हणाले.
‘न्याय मिळवण्यासाठी राज ठाकरेंकडे आलोय’
“माझ्याकडे हे प्रकरण आलं, तेव्हा तक्रार केली. त्यादिवशी एक मोठा गट आम्हाला येऊन भेटला. त्यांची अपेक्षा होती की हा विषय राज ठाकरे यांच्याकडे पोहोचावा. हा विषय त्यांच्याकडे गेला तर त्यांना न्याय मिळेल. काही लोकांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून राज ठाकरे यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. संदीप देशपांडे आणि मी साहेबांकडे आमचं मत मांडलं. ते सीएम साहेबांशी बोलणार आहेत” असं मनीष धुरी म्हणाले.