मुंबई: भांडूप येथे दोन महिला मॅनहोलमध्ये पडताना वाचल्या. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. टीव्ही9 मराठीनेही ही बातमी लावून धरली. त्यामुळे महापालिकेला खडबडून जाग आली आहे. पालिकेने तातडीने मुंबईतील सर्व मॅनहोल तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काही ठिकाणी पालिका प्रशासनाने मॅनहोल तपासणीचे कामही सुरू केलं आहे. (bmc order to check manhole in mumbai after bhandup incidents)
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणी करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्तइकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. भांडूप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसामुळे निघाले होते. त्यामुळे दोन महिला त्यात पडताना वाचल्याची चित्रफित समाजमाध्यमांमध्ये तसेच वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली आहे. त्याची दखल घेत पालिकेने सदर मॅनहोल तातडीने हटवून तेथे नवीन मॅनहोल लावले आहे.
पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. मात्र, कालच्या जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर पालिकेने पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली आहे. आवश्यक तेथील मॅनहोल बदलण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसे सक्त निर्देश इकबाल सिंह चहल आणि वेलरासू यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने मुंबईला झोडपून काढले. मात्र, आज मुंबईत पावसाचा जोर अधिक नव्हता. मध्ये मध्ये उसंत घेऊन पाऊस पडत होता. त्यामुळे मुंबईत पाणी साठण्याच्या घटना घडल्या नाहीत. पाऊस थांबून थांबून येत असल्याने पाण्याचा लवकर निचरा होत होता. काल अनेक जणांचा पावसामुळे खोळंबा झाला होता. त्यामुळे आज अनेकांनी गाडी घेऊन घराबाहेर पडणं टाळलं. त्यामुळे मुंबईत आज वाहतुक कोंडीची समस्या दिसली नाही. मात्र, चार दिवस अतिवृष्टी राहणार असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. (bmc order to check manhole in mumbai after bhandup incidents)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7.30 AM | 10 June 2021https://t.co/SPrmCv1eJS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2021
संबंधित बातम्या:
Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले
Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी
(bmc order to check manhole in mumbai after bhandup incidents)