Mumbai : बीएमसीकडून नागरिकांच्या तंदुरूस्तीसाठी शिवयोग केंद्रे, जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया
मुंबईकरांना निरोगी ठेवण्यासाठी यंदाच्या आर्थिक अर्थसंकल्पात बीएमसीने काही नवीन योजना जाहीर केल्या होत्या. यापैकी प्रमुख म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक आणि शिव योग केंद्र आहे.
मुंबई – आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक शारीरिक (Physical) आणि मानसिक (Mental) आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. मुंबईतल्या अधिक लोकांना मधुमेह, रक्तदाब अशा अनेक आजारांनी ग्रासले आहे. अशा परिस्थितीत लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने आता ‘शिव योग केंद्र’ (Shiv Yoga Center) सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या केंद्रासाठी योग प्रशिक्षकांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागाला स्वतंत्र ईमेल आयडी देण्यात येणार आहे. हे योग केंद्र जूनमध्ये सुरू करणार असल्याचं बीएमसीने जाहीर केलं आहे.
अर्थसंकल्पात तरतूद
मुंबईकरांना निरोगी ठेवण्यासाठी यंदाच्या आर्थिक अर्थसंकल्पात बीएमसीने काही नवीन योजना जाहीर केल्या होत्या. यापैकी प्रमुख म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक आणि शिव योग केंद्र आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बीएमसीने कसरत सुरू केली आहे. बीएमसी कमिशनर इक्बाल सिंग चहल वैयक्तिकरित्या योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करत आहेत.
असा राबवणार उपक्रम
सार्वजनिक सभागृह, पालिका आणि खाजगी शाळांचे हॉल, विवाह हॉल इत्यादी ठिकाणी योग केंद्रे उभारली जातील. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांचा 30 जणांचा एक गट तयार केला जाईल. बीएमसीने जाहीर केल्याप्रमाणे ३ महिन्यांचा कोर्स असेल. दर महिन्याला 20 सत्रे होतील. योग प्रशिक्षक आठवड्यातून 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार संबंधित केंद्रावर उपस्थित राहतील.
महापालिका योगासाठी सर्व सुविधा मोफत पुरवणार आहे
रोज योगाचे सत्र 2 तास चालेल, म्हणजे सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी एक ईमेल आयडी तयार केला जाईल, मेलच्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्या 30 लोकांचा एक गट शिव योग केंद्राद्वारे योग प्रशिक्षण घेण्यास तयार केला जाईल. महापालिका योगासाठी सर्व सुविधा मोफत पुरवणार आहे.
सामुदायिक स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी नामनिर्देशित योग संस्थेशी प्रशिक्षक संलग्न केला जाईल. या प्रशिक्षणासाठी, प्रशिक्षक आणि पालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.