मुंबई महापालिका म्हणते, ‘या’ दिवशी कोणालाही पहिला डोस दिला जाणार नाही
मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर, शनिवार (4 सप्टेंबर) रोजी कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत.
मुंबई : कोव्हिड-19 विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर, शनिवार (4 सप्टेंबर) रोजी कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी कोव्हिड-19 लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. (BMC will give only second dose of corona vaccine on 4th september)
मुंबईसह भारतात कोव्हिड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोव्हिड-19 लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोव्हिड-19 लसीकरण कार्यक्रम अंतर्गत दिनांक 16 जानेवारी 2021 पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्ये आज (दिनांक 1 सप्टेंबर 2021) पर्यंत 69 लाख 26 हजार 255 लाभार्थ्यांना पहिली मात्रा (डोस) तर 25 लाख 17 हजार 613 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आलेली आहे. या आकडेवारीवरुन असे निदर्शनास येते की, पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण कमी आहे.
तसेच, ब्रेक द चेन या अंतर्गत नव्याने सुधारीत तत्वे प्रसारीत करण्यात आलेली आहेत. त्यात सार्वजनिक निर्बंध शिथिल होऊन विविध आस्थापना सुरु झालेल्या आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा देखील देण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत, कोव्हिड-19 या आजाराची रुग्णसंख्या काहीशी वाढत आहे. तसेच, कोव्हिड-19 ची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस (कोविशिल्ड असल्यास पहिल्या डोस नंतर 84 दिवस आणि कोव्हॅक्सीन असल्यास पहिल्या डोस नंतर 28 दिवस पूर्ण झाल्यास) घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने, मुंबईतील सर्व शासकीय व सार्वजनिक लसीकरण केंद्रावर, शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी कोव्हिड-19 लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित केले आहेत. म्हणजेच, या दिवशी शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही.
दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी सदर सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीचे 2 डोस पूर्ण करा
राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार म्हणाले.
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
इतर बातम्या
माथाडी कामगारांना अजून 20 हजार लस देणार, फडणवीसांचं आश्वासन; नरेंद्र पाटलांचं कौतुक
पुणे शहरात 30 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण! एका दिवसात 64 हजार नागरिकांना लस
दुसरा डोस मिळणं कठीण, नाशिकमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यानं ज्येष्ठ नागरिकांवरही भटकंतीची वेळ
(BMC will give only second dose of corona vaccine on 4th september)