बीएमसीकडून 4 महिन्यात ‘सँडहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानकाजवळ पर्जन्य जलवाहिनी, अतिवृष्टीनंतरही पाणी साचले नाही
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणि मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे केलेल्या कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय कामांमुळे सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाजवळ 4 महिन्यात पर्जन्य जलवाहिनीचं काम पूर्ण झालंय.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणि मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे केलेल्या कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय कामांमुळे सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाजवळ 4 महिन्यात पर्जन्य जलवाहिनीचं काम पूर्ण झालंय. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी होऊनही रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले नाही. यासाठी रेल्वे ट्रॅकच्या खालून तब्बल 415 मीटर लांबीची आणि 1800 मिलिमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी मध्यरेल्वेद्वारे टाकण्यात आली. ही पर्जन्य जलवाहिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यासाठी रेल्वे हद्दीच्या पुढील भागात 25 मीटर लांबीची एक अतिरिक्त ‘बॉक्स ड्रेन’ महानगरपालिकेच्या वतीने टाकण्यात आली.
‘बॉक्स ड्रेन’ बांधण्यात आलेल्या ठिकाणी असणाऱ्या टाटा कंपनीच्या अतिउच्च दाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्या आणि मोठ्या जलवाहिन्या यामुळे हे कार्य अत्यंत आव्हानात्मक होते. तथापि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी हे काम अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने व अल्पावधीत पूर्ण केले आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.
“तब्बल 440 मीटर लांबीच्या व दोन पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण”
याबाबत अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू म्हणाले, “बृहन्मुंबई महानगरपालिका व मध्य रेल्वे यांनी अत्यंत चांगला समन्वय साधून केवळ 4 महिन्यांच्या कालावधीत एकूण तब्बल 440 मीटर लांबीच्या व दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले. या कामासाठीचा सर्व खर्च बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला, असं वेलरासू यांनी नमूद केले.
“रेल्वे रुळांवरील पावसाळी पाणी साचण्याच्या ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम”
वेलरासू म्हणाले, “मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे रुळांवरील पावसाळी पाणी साचण्याच्या ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. त्यासाठी आवश्यक त्या त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील आपल्या हद्दीत काम करीत आहे. दक्षिण मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकानजीकच्या परिसरात दरवर्षी अतिवृष्टी दरम्यान पाणी साचून रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अभियंत्यांनी व मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे अभ्यास केला.”
रेल्वे वाहतूकीला कोणताही अडथळा न येता सदर कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय काम
“फक्त नाल्यांवर अवलंबून न राहता, ‘रेल्वे ट्रॅक’च्या खाली ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन मार्ग खुला होणार होता. यानुसार मार्च 2021 पासून हे काम हाती घेण्यात आले. त्यात 415 मीटर लांबीची व 1800 मिलीमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी ही अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून व ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने बांधण्यात आली. त्यामुळे रेल्वे वाहतूकीला कोणताही अडथळा न येता सदर कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय काम करता येऊ शकले. हे काम पूर्ण करताना वेगवेगळ्या आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने त्यासाठी योग्य ताळमेळ ठेवला,” असं वेलरासू यांनी नमूद केले.
“25 मीटर लांबीची ‘बॉक्स ड्रेन’ टाकून मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडणी”
ते पुढे म्हणाले की, रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन मार्ग तयार झाल्यानंतर, खरी गरज होती ती महानगरपालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडणी करण्याची. कारण त्याशिवाय पाण्याचा निचरा होणे शक्यच नव्हते. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 25 मीटर लांबीची ‘बॉक्स ड्रेन’ टाकून नवीन पर्जन्य जलवाहिनी महापालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता पथकाद्वारे करण्यात आलेले हे काम देखील अत्यंत आव्हानात्मक व कौशल्यपूर्ण होते. यामध्ये पी. डि’मेलो मार्गावर रेल्वे आयुक्त कार्यालय प्रवेशद्वारापासून मॅलेट बंदर जंक्शन पर्यंत सुमारे 25 मीटर अंतरात पर्जन्य जल वाहून नेण्यासाठी प्रारंभी रेल्वे प्रशासनाकडून 1800 मिमी व्यासाचा भूमिगत बोगदा (मायक्रो टनेलिंग) बांधण्यात येणार होता. मात्र नागरी उपयोगिता सेवांचे जाळे पाहता, रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला ही काम करण्याची विनंती केली. त्यास बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ह्यांनी मंजुरी दिल्यानंतर महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने हे काम हाती घेतले. पी डिमेलो मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने वाहतूक विभागाची ना-हरकत प्राप्त करून 15 एप्रिल 2021 रोजी हे काम सुरू करण्यात आले.
हेही वाचा :
पालिकेच्या कारभारावर नागरिक संतापले, राजकारण्यांना इमारतीमध्ये प्रवेशबंदी
लस साठ्याअभावी उद्या मुंबईत शासकीय, मनपा केंद्रांवर लसीकरण बंद
बीएमसी निवडणुकीपूर्वी नामकरणावरुन भाजप-शिवसेनेत जुंपली, टिपू सुल्तान आणि बागेच्या नावाचा वाद काय?
व्हिडीओ पाहा :
BMC work of Rainwater aqueduct in Mumbai within 4 months