Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणी किरीट सोमैया आणि मुलगा नील सोमैयाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन
आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमैया यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. हा पैसा त्यांनी 2014ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला होता.
मुंबई : भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमैया यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) युद्धनौका वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. किरीट सोमैया यांनी 2014 साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत जवळपास 58 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमैया यांनी लाटली, असा आरोप करण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील यावरून किरीट सोमैयांवर टीकास्त्र सोडले होते. याच प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
संजय राऊतांनी केली होती टीका
आयएनएस विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमैया यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. हा पैसा त्यांनी 2014ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला होता. हा घोटाळा करून किरीट सोमैया यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमैया यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.
‘देणग्या गोळा केल्या’
2013-14मध्ये, 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाचे प्रतीक असलेले भारतीय नौदलाचे जहाज INS विक्रांत आपली सेवा संपवत असताना त्याला ‘युद्ध संग्रहालय’ बनवण्याची मागणी करण्यात आली, तेव्हा सरकारने यासाठी 200 कोटी रुपये लागणार असल्याचे सांगितले. अशा वेळी विक्रांतला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी किरीट सोमैया यांनी विक्रांत वाचवा मोहीम सुरू केली होती. मुंबईतील विमानतळापासून विविध रेल्वे स्टेशन, चर्च गेट, नेव्ही नगर आणि अनेक ठिकाणी देणग्या गोळा केल्या होत्या.
‘घोटाळा नसून देशद्रोह’
अशा प्रकारे 57 कोटींहून अधिक देणग्या जमा झाल्या. किरीट सोमैया यांनी ही रक्कम राज्यपालांच्या खात्यात म्हणजेच राजभवनात जमा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र हे पैसे त्यांनी राजभवनात जमा केले नाहीत. हा पैसा त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांचा मुलगा नील किरीट सोमैया यांच्या कंपनीत गुंतवला. हा घोटाळा केवळ घोटाळा नसून देशद्रोह आहे, अशी टीका करण्यात आली होती.