मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाची 14 आमदारांना नोटीस, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर आता पुन्हा शिवसेनेत हालचाली वाढल्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई | 17 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. या निकालात शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात याचिका दाखल केलीय. तर शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या सर्व 14 आमदारांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाच्या याचिकेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने 12 जानेवारीला मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने या यातिकेप्रकरणी ठाकरे गटाचे सर्व 14 आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी येत्या 8 फेब्रुवारीला प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी नोटीसचं उत्तर देण्यात यावं, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या सर्व 14 आमदारांना दिले आहेत.
शिंदे गटाने याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
विधानसभा अध्यक्षांच्या निकालात त्रुटी असल्याचं घोषित करावं, त्यामुळे त्यांच्या याबाबतच्या निकालाला रद्द करुन ठाकरे गटाच्या सर्व 14 आमदारांना अपात्र घोषित करावं, अशी मागणी शिंदे गटाकडून याचिकेत करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे. त्यांनी आपल्या इच्छेनुसार शिवसेनेचं सदस्यत्व सोडून दिलं आहे, असा दावा शिंदे गटाच्या याचिकेत करण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या या आमदारांच्या अडचणी वाढू शकतात
शिंदे गटाच्या या याचिकेमुळे आता ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगांवकर, राजन साळवी, प्रकाश फातर्पेकर, कैलास पाटील, सुनील राऊत, विनायक चौधरी, नितीन देशमुख, सुनील प्रभू, वैभव नाईक, संजय पोटनीस, रवींद्र वायकर यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. अर्थात मुंबई हायकोर्टात दोन्ही बाजूने काय युक्तिवाद होतो त्यावर हे सर्व अवलंबून असणार आहे