Corona Outbreak | सेन्सेक्स घसरला, 60 सेकंदांत साडेचार लाख कोटींचा चुराडा
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवल्यानंतर मुंबई शेअर बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. Bombay Stock Exchange Sensex cracks
मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावरही होताना दिसत आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजार उघडताच निर्देशांकात (सेन्सेक्स) 1459 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीही 362 अंकांनी खाली घसरला. यामुळे 60 सेकंदांत साडेचार लाख कोटींचा चुराडा झाल्याची माहिती आहे. (Bombay Stock Exchange Sensex cracks)
अमेरिकेला शिंक आली, की जगाला थंडी भरते, या म्हणीचा प्रत्यय शेअर बाजारात आला. अमेरिकेत 57 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली होती. त्यानंतर मुंबई शेअर बाजारावरही मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.
शेअर मार्केट उघडताच पहिल्या मिनिटभरात गुंतवणूकदारांनी 4.42 लाख कोटी रुपये गमावले. शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचा बाजारभाव 147.59 लाख कोटींवरुन 143.17 लाख कोटींवर आली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर ‘येस बँके’तील खात्यातून ग्राहकांना केवळ 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. या धक्क्यातून गुंतवणूकदार सावरत असतानाच शेअर बाजारातही गडगडाट पाहायला मिळाला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरुन 73.90 वर स्थिरावला. ऑक्टोबर 2018 पासून ही सर्वात मोठी घट आहे.
Sensex nosedives 1,459.52 pts to 37,011.09 in opening session; Nifty tanks 362.30 pts to 10,906.70
— Press Trust of India (@PTI_News) March 6, 2020
आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनशी व्यवहार असलेल्या देशांना मोठा फटका बसला आहे. गेल्या शुक्रवारीही निर्देशांक तब्बल 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला होता. त्यावेळी बाजार सावरण्याआधी 5 मिनिटांत 5 लाख कोटी रुपये बुडाले होते.
बाजारात गडगडाट का?
चीनमध्ये कोरोना विषाणून धुमाकूळ घातल्याने, अनेकांचा जीव गेला आहे. त्याचा परिणाम चीनमधील उद्योगावर आणि पर्यायाने आयात-निर्यातीवर झाला. त्यामुळे जागतिक बाजारावरही आपोआपच त्याचा परिणाम दिसून आला. गुंतवणूकदार आपली गुंतवणूक मागे घेत, बाजारातून पैसे काढत आहेत. त्यामुळे साहजिकच जागतिक निर्देशांक गडगडत असल्याने, त्याचे हादरे मुंबई शेअर बाजारालाही बसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचा शेअर बाजार 2008 नंतर सर्वात निचांकी पातळीवर पोहोचला. (Bombay Stock Exchange Sensex cracks)