Budget 2023 : लातूर येथील कारखान्यात होणार आलीशान वंदेभारतच्या डब्यांची निर्मिती, रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट केले
गेल्या अनेक वर्षांनंतर रेल्वेत इतक्या व्यापकस्तरावर गुंतवणूक झाली असून रेल्वेचे खरे पोटेन्शियल वापरले जाणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
मुंबई : अर्थसंकल्पात ( Budget ) रेल्वेसाठी अनेक वर्षांनंतर इतकी जादा गुंतवणूक झाली आहे. रेल्वेमध्ये ( railway) झालेल्या 2.40 लाख कोटी रूपयांच्या भांडवली गुंतवणूकीने रेल्वेची खरी क्षमता वापरली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या रोजच्या अडीच कोटी तर वार्षिक 800 कोटी रेल्वे प्रवाशांच्या आकांक्षा पूर्ण होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुख्य अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नवी दिल्लीतून दूरसंवाद माध्यमाद्वारे जाहीर केले आहे. चेन्नईच्या आयसीएफ कोच फॅक्टरीसह हरीयाणाच्या, सोनीपत आणि युपीच्या रायबरेलीच्या कारखान्यात सेमी हायस्पीड वंदेभारत ट्रेनच्या डब्यांची बांधणी केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधानाच्या दूरदृष्टीने मेक इन इंडीया मोहीमेंतर्गत तयार केलेल्या आलिशान वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांना पसंद पडत आहेत. चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यासह महाराष्ट्रातील लातूर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि हरीयाणातील सोनिपत येथील रेल्वेच्या कारखान्यात वंदेभारतच्या कोचची निर्मिती केली जाईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. वंदेभारतला देशाच्या कानाकोपऱ्यांना वंदेभारतने जोडण्याचे पंतप्रधानांचे महत्वाकांक्षी स्वप्न आम्ही पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातील 1278 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाची व्यापक मोहीम रेल्वेने हाती घेतली आहे, या स्थानकांच्या विकासाचे तीन गट करण्यात आले आहेत. नवीन दिल्ली, अहमदाबाद, कानपूर, लखनऊ आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यासारख्या मोठ्या स्थानकांचा, पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यासारख्या मध्यम आणि लहान अशा देशभरातील एकूण 1278 रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.
2009-14 : वार्षिक सरासरी 10,623 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद
2014-19 : वार्षिक सरासरी 24,347 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद
2022-23 : 77,271 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद
2023-24 : ₹ 2,40,000 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद