बिनजोड छकडेवाला…! बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांची अकाली एक्झिट
महाराष्ट्रातील फेमस बिनजोड छकडेवाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे. पंढरीशेठ यांच्या अकाली एक्झिटने बैलगाडाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. नेमके कोण होते पंढरीशेठ जाणून घ्या.
रवी खरात, मुंबई : पंढरीशेठ फडके विहिघरवाला, बिनजोड छकडेवाला… या गाण्याप्रमाणे रायगडसह संपूर्ण महाराष्टाभर आपले नाव करणारा बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांनी अकाली एक्सिट घेतली आहे. दीर्घ आजाराने लाखो चाहत्यांचा ‘शेठ’ हिरावून नेल्याची हळहळ संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होत आहे.त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे. पंढरीशेठ फडके हे पनवेल तालुक्यातील विहिघर गावचे रहिवासी होते. बैलगाडा शर्यतींवर त्यांचे प्रचंड प्रेम होते.
कोरोना काळात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष असलेले पंढरीशेठ फडके यांनी या काळात अनेक मंत्री, आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवले आणि शर्यती सुरु करण्यास अपार मेहेनत घेतली. बैलगाडा शर्यती सुरु झाल्या मात्र बदलापूरमध्ये मागील वर्षी 2 गटात झालेल्या गोळीबारात प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपातून पंढरीशेठ फडके यांना जेलवारी करावी लागली. नुकतेच ते जेलमधून बाहेर आले होते.
आता पुन्हा नव्या जोमाने ते नवी इंनिंग सुरु करत असतानाच अचानक त्यांना आजारपणाने ग्रासले. पंढरीशेठ फडके यांना मधुमेहाचा प्रदीर्घ आजार होता. नुकतेच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पाय कापण्यात आल्याने त्यांना त्यांचे सहकारी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असत. मात्र पंढरीशेठ यांनी हार मानली नव्हती.
पहिल्यासारख्याच उत्साहात ते आपली बैलगाडाची आवड जोपासत आपल्या चाहत्यांच्या आग्रहात्सव अनेक शर्यतींना भेटी देत असत मात्र दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने त्यांना गाठलेच आणि लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पंढरीशेठ अनंतात विलीन झाले आहेत. या वृत्ताने त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.