एकाच जागी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा, मंत्री अस्लम शेख यांची मागणी
एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली.
मुंबई : एकिकडे संपूर्ण राज्याचा अर्थसंकल्प तर दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा अर्थसंकल्प अशी तुलना नेहमीच होत असते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत अनेक मोठे निर्णय होतात. मात्र, यात कोणते निर्णय होणार यात प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. अशातच आता मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपले जात असल्याचा आरोप केलाय. तसेच तात्काळ या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे केली. त्यांनी याबाबत मनपा आयुक्तांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली (Cabinet Minister Aslam Shaikh demand of BMC officer transfer0.
अस्लम शेख यांनी पत्रात म्हटले आहे, “ठरावीक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम आहे. असं असताना महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने काही बदलीपात्र अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचं चित्र आहे. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत हे चित्र सर्रास पहायला मिळतं आहे.”
‘काही अधिकाऱ्यांकडून विशिष्ट व्यक्तींचं हितसंबंध जपण्याचं काम सुरु, 15 दिवसात बदल्या करा’
“कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करीत आहेत. त्यामुळे अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने आणि काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करावी. ही प्रक्रिया येत्या 15 दिवसांमध्ये पूर्ण करावे,” असंही अस्लम शेख यांनी या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा :
रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही : अस्लम शेख
उत्तर प्रदेश आधी भयमुक्त करा, मग बॉलिवूडचं स्वप्न बघा, अस्लम शेख यांचा योगींवर हल्ला
‘लव्ह जिहाद’ हा भाजपचा अजेंडा, मुलगा-मुलीची पसंती महत्त्वाची: किशोरी पेडणेकर
Cabinet Minister Aslam Shaikh demand of BMC officer transfer