इरई धरणावरील तरंगते सौर ऊर्जा पार्क पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार; ऊर्जामंत्री राऊत यांनी घेतला आढावा; पर्यटकांसाठ सेल्फी पॉईंट
चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाघांचा व बिबट्यांचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिले आहेत.
मुंबई : चंद्रपूर येथील इरई धरणावर (Chandrapur irai dam) 105 मेगावॅटचे तरंगता सौर ऊर्जा पार्क (solar power park) उभारण्यात येणार असून यासंदर्भात आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 580 कोटी रुपये अपेक्षित असून 15 महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रपूर येथे इरई धरणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १०५ मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा पार्क लवकरच उभारण्यात येणार आहे.या संदर्भात आज मी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. हा सौर पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल.#FloatingSolarPark @INCMaharashtra @connectMSPGCL pic.twitter.com/HIshMcKTVP
— Dr. Nitin Raut ?? (@NitinRaut_INC) June 14, 2022
चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. यामधून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा करण्यात येतो.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
या सौर ऊर्जापार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य ठिकाण ठरणार आहे.
गॅलरी व सेल्फी पॉईंटचे बांधकाम
या ऊर्जापार्कचे पर्यटकांना अवलोकन करता यावे यासाठी गॅलरी व सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात येणार आहे. चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाघांचा व बिबट्यांचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिले आहेत. या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविम सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे व इतर अधिकारी उपस्थित होते.