Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत.
मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण मराठा समाजाला आरक्षण देणार, असं आश्वासन दिलं. पण त्यानंतरही मराठा नेते मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांना आज सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव वाढला आहे.
विशेष म्हणजे याच दबावातून वरिष्ठ पातळीवरील हालचालींना प्रचंड वेग आलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबतच्या घडामोडींमधील ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थेट दिल्लीच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत मराठा आरक्षणावर खलबतं होणार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत हे दोन्ही मोठे नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षण लागू करण्यासाठी काय-काय करता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत आजच मोठा निर्णय?
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावेळी कोणतीही चुकीची घटना घडू नये यासाठी आजच काही मोठा निर्णय घेता येईल का, याबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते दिल्लीत गेल्याची चर्चा आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची केंद्रीय पातळीवर देखील दखल घेण्यात आलीय. त्यांच्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या काही भाष्य करतात का? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
‘दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही देणार नाही’
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची बातमी मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंतदेखील पोहोचली आहे. या घडामोडींवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “तुम्ही दिल्लीला गेला आहात तर निर्णय घेऊन या. दिल्लीतून खाली हात आलात तर एक तासही देणार नाही’, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय.