अचानक हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ‘वर्षा’वर दाखल, नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन वातावरण तापलं आहे. तसेच कांदा प्रश्नही तापला आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अचानक रात्री दहा वाजेनंतर हालचालींना वेग आलाय.
निखिल चव्हाण, Tv9 मराठी, मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : मुंबईत रात्री 10 वाजेच्या नंतर अचानक राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अचानक घडामोडी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमरास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ‘वर्षा’वर दाखल झाले. या तीनही नेत्यांमध्ये ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय.
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्नाबाबतही या बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवादरम्यान अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. त्यानंतर आता अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत.
‘वर्षा’वर नेमकी खलबतं काय?
मराठा आरक्षणाबाबत अल्टिमेटम दिला जातोय. दुसरीकडे ओबीसी नेते मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देऊ नये, यासाठी आंदोलने करत आहेत. तर धनगर समाजाकडूनही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलने केली जात आहे. या सगळ्या घडामोडी सुरु असताना कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं लक्ष आहे. अनेक आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची ताटकळत वाट पाहत आहेत. पण तरीही अद्याप विस्तार झालेला नाही. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती. पण आमदारांची नाराजी ओढवेल म्हणून विस्तारानंतर मंत्रिमडळाचा विस्तार घोषित केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. पण त्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय होतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.