मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर शनिवारी रात्री नेमकी खलबतं काय? सर्वात मोठी बातमी समोर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नुकतीच 'वर्षा' बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीतील आतली बातमी समोर आलीय. या बैठकीत तीनही नेत्यांमध्ये अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री दहा वाजेनंतर महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वर्षा’ बंगल्यावर रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले. विशेष म्हणजे संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ येथील निवासस्थानी अजित पवार बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. याउलट विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जावून बाप्पाचं दर्शन घेतलं.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. पण अजित पवार गणेशोत्सवाच्या संपूर्ण दहा दिवसांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
‘वर्षा’वर अचानक हालचाली
विशेष म्हणजे गणेशोत्सवानंतर एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी अचानक शनिवारी रात्री हालचाली वाढल्या. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास दाखल झाले. या तीनही दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास दीड तास खलबतं झाली. यावेळी नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’वर बैठक सुरु झाली त्यावेळी राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात होते. या तीनही नेत्यांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा आणि खलबतं होतील याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. राज्यात ओबीसी, मराठा आणि धनगर आरक्षणावरुन वातावरण तापलंय. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली.
याशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. त्यामुळे या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण त्यानंतर आता या बैठकीतली आतली बातमी समोर आली होती. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या विषयावर खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘वर्षा’वर नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये शनिवारी रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती.
या प्रकरणात एकूण ३४ याचिका आहेत. या सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घ्यावी, अशी ठाकरे गटाची मागणी होती. पण शिंदे गटाने त्यावर आक्षेप घेत एकत्र सुनावणी न घेण्याची भूमिका मांडली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी या सर्व याचिकांच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती समोर आली होती. पण या वेळापत्रकावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
आता या प्रकरणी लवकरच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत कान टोचले होते. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकरणी समोर येणाऱ्या पेच प्रसंगांना कसं सामोरे जावं, वकिलांची मदत घेऊन कशाप्रकारे कायदेशीरपणे भक्कम बाजू मांडायची, वकिलांशी कसा समन्वय साधायचा, याबाबत ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.