ठाकरे-फडणवीस यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, एकनाथ शिंदे म्हणाले….
महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्याचा धक्का बसावा असा राजकीय योगायोग जुळून आलेला आज बघायला मिळाला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आज विधान भवमध्ये गेले. यावेळी एक अनोखा प्रकार बघायला मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या घटनेची राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा सुरु आहे. या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. “कुणी लिफ्ट मागितली तरी ती सहाव्या मजल्यापर्यंत काही पोहोचू शकणार नाही. दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे म्हणजे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
“महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. त्यामुळे काही लोकं बोलत आहेत, काही लोकं वेगळा आनंद साजरा करत आहेत, काही लोकं पेढे वाटत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून पेढे वाटत आहेत. आनंद आहे. भाजपच्या 240 जागा आल्या, इंडिया आघाडीच्या सर्वांच्या मिळून तेवढ्या आल्या नाहीत. नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून काही लोक आनंदाने पेढे वाटताना पाहतोय. काही लोक असे छाती फुगवून येताना आपण पाहतोय. गिरे तो भी टांग उपर, असं आपण म्हणतो. अरे तुमचा देशात मोदींनी पराभव केलाय. एवढं खोट्या बातम्या पसरवून, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असं खोटं वातावरण निर्माण करुन सुद्धा या देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना पुन्हा देशाचा पंतप्रधान केलं. याचा आनंद विरोधक साजरा करतात याचं मला आनंद आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
‘निरोप कोण कुणाला देईल हे…’
“निरोप कोण कुणाला देईल हे येणाऱ्या काळात ठरेल. शेवटी हे जनतेच्या हातात असतं. जनता जनार्दन हे ठरवत असते. त्यामुळे आमचं हे अधिवेशन निर्धाराचं आणि निश्चयाचं आहे. दोन वर्षे आमच्या सरकारने केलेल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याचा आमचा निश्चय आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘शेतकऱ्यांना कुणी फसवलं?’
“महायुती मजबुतीने काम करत आहे. महायुतीने गेल्या दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय तुमच्यासमोर आहेत. आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं असं ते विचारत होते. त्यांनी रेगूलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये इन्सेनटीव्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिले का? ते आम्ही दिले. आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा केले. मग शेतकऱ्यांना कुणी फसवलं? आम्ही शेताच्या बांधावर जाणारे लोकं आहोत. शेतकऱ्यांशी संवाद साधणारं महायुतीचं सरकार आहे”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
‘अमावस्या आणि पौर्णिमा हे त्यांच्या डोक्यात, ते लिंबू-मिरच्यावाले’
“विरोधकांनी शेताचा बांध पाहिला आहे का? त्यासाठी शेतात जावं लागतं. चिखल तुडवावा लागतो. इर्शारवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं. फिल्डवर जावं लागतं. घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत. वर्क फ्रॉम होम चालत नाही. इथे डायरेक्ट फिल्डवर काम करावं लागतं. लंडनमधल्या पंचतारांकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेती केव्हाही बरी की नाही? शेतकऱ्याने चांगली पंचतारांकीत शेती करु नये का? शेतकऱ्यांनी चांगली पिकं घेऊ नयेत का? शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी किंवा ड्रॅगन फ्रुट लावू नये का? अमावस्या आणि पौर्णिमा हे त्यांच्या डोक्यात, ते लिंबू-मिरच्यावाले आहेत”, अशा खोचक शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.