CM Uddhav Thackeray : कर्मानं मरणार त्याला धर्मानं काय मारायचं? शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांचा कानमंत्र सांगत उद्धव ठाकरेंचा भाजपावरही हल्लाबोल
आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची गरज आहे. हिंदूंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपाची चाल आहे, अशी टीका त्यांनी भाजपावर केली. शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मुंबई : साहेब म्हणायचे, जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपा तसेच राज ठाकरेंचा समाचार घेतला. शिवसंपर्क अभियान टप्पा 2च्या निमित्ताने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र येथील शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे राजकारण आणि शिवसेनेची भूमिका यावर आपले मत मांडले. शिवसेना वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, शिवसेना वाढवायची, असे ते म्हणाले. दरम्यान, काल प्रवक्त्यांची बैठक झाली होती तर आज शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांची बैठक झाली. अनेक दिवसांनी शिवसंपर्क मोहीम (Campaign) सुरू झाली आहे, इतर पक्ष मुहूर्ताची वाट न बघता संपर्क करताहेत. तेव्हा पक्ष वाढवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
‘महाराष्ट्राने दिशा दाखवण्याची गरज’
पुढे ते म्हणाले, की विरोधी पक्ष हिंदुत्वावरून बोलत आहेत. त्यांच्यात एक पद्धत आहे, पश्चिम बंगाल, केरळसारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा त्यांचा प्रयत्न आहे. बंगालचे मोठे कर्तृत्व आहे. यावेळी ममता दिदींनी गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची गरज आहे. हिंदूंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी अमराठी, ही भाजपाची चाल आहे, अशी टीका त्यांनी भाजपावर केली.
‘सगळे स्वतः करता हवे आहे’
येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. आघाडीने कोल्हापूरला हिरिरिने पुढाकार घेतला. तसा प्रत्येकाने घ्यायला हवा. संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने फोडली. जागांसाठी ती जनसंघाने फोडली. यांचे मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळे स्वतः करता हवे आहे, असा घणाघात त्यांनी केला.
दौऱ्याचा दुसरा टप्पा होणार सुरू
मार्गदर्शन करताना ते म्हणाले, की गट प्रमुख, शाखाप्रमुख हे सगळे पदाधिकारी आणि त्यांच्या याद्या मला पाहिजेत. जन्मापासून शिवसेनेकडे नविन, तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या, मग बदल करा. त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे त्याला समजू द्या. गावाची जनतेची कामेसुद्धा जरूर करा. शिवसैनिक अंगार आहे, त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तर शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे, हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. आता मी फिरणार, दौरे करणार. दुसरा टप्पा आता सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.