CM Uddhav Thackeray: टीनपाटांना सुरक्षा द्यायला तुमच्या बापाचा माल आहे का?; उद्धव ठाकरेंचा केंद्राला सवाल
CM Uddhav Thackeray: आमच्या हिंदुत्वाचं मोजमाप घेणारे तुम्ही कोण? काँग्रेससोबत गेले. हो गेलो ना. का गेलो? तुम्ही ढकललं आम्हाला. काँग्रेससोबत गेलो तरी हातातला आणि हृदयातला भगवा सोडला नाही.
मुंबई: टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणाऱ्यांना झेडप्लस सुरक्षा दिली आहे. या टीनपाटांना सुरक्षा मिळते. पण तिकडे काश्मिरी पंडितांना (kashmiri pandit) सुरक्षा दिली जात नाही. राहुल भट सांगत होता बदली करा. पण त्याचं ऐकलं नाही. पण इथे भोकं पडलेल्या टीनपाटांना केंद्राची सुरक्षा देत आहेत. कुणाला वाय प्लस, कुणाला झेडप्लस सुरक्षा दिली जात आहे. बापाचा माल आहे तुमच्या? लोकांचा पैसा आहे तो. लोकांच्या पैशावर ज्यांना सुरक्षा द्यायची त्यांना देत नाही आणि अशा लोकांना देता ज्यांना देण्याची गरज नाही. अशा भोकं पडललेल्या गळक्या टीनपाटाचा उपयोग काय? टीनपाट बोललो. खरंतर टमरेलच बोलायचं होतं, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली. वांद्रे येथे बीकेसी मैदानावर शिवसेनेची (shivsena) अतिविराट सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, मनसेवर घणाघाती हल्ला चढवला.
आमच्या हिंदुत्वाचं मोजमाप घेणारे तुम्ही कोण? काँग्रेससोबत गेले. हो गेलो ना. का गेलो? तुम्ही ढकललं आम्हाला. काँग्रेससोबत गेलो तरी हातातला आणि हृदयातला भगवा सोडला नाही. हे विधानसभेतही बोललो आहे. काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे? कधी सोडलं, कधी नेसलं. नेसायचं ठिक आहे. पण सोडायची लाज तुम्हाला नसेल वाटत पण हिंदुत्व ही नेसण्याची आणि सोडण्याचं नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो उघड गेलो. तुमचा सारखा सकाळचा शपथविधी नाही केला. तुम्ही केलं तर पवित्रं आम्ही केलं तर अपवित्रं. आम्ही राष्ट्रवादी सोबत गेलो तर दगा दिला. तुम्ही राष्ट्रवादीसोबत सकाळी शपथ घेतली ते काय होतं. म्हणून मी म्हटलं सकाळचा शपथ विधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडिला मांडी लावून गुणगान गात बसले असेत असं वाटतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
औरंगाबाद हे संभाजीनगरच
संभाजी नगरच्या नामांतराची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो ओवैसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकून आला. संजय, तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. यांचं जे काही चाललं.. याची ए टीम, बी टीम, सी टीम… कुणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या हाती भोंगा द्यायचा, कुणाच्या तरी हातात हनुमान चालिसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार. आम्ही बोंबलायला मोकळे. आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
आता काश्मीरमध्ये घंटा वाजवायचा का?
काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी राहुल भट यांची हत्या केली. त्यावरूनही त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सरकारी कार्यालयात घुसून त्या भटला गोळ्या घातल्या. काय करायचं आता. त्या कार्यालयासमोर हनुमान चालिसा वाचायचा. की घंटा वाजवायचा. काय करायचं काय आता. अतिरेकी येतात. महसूल कार्यलायत घुसतात. नाव विचारतात. आणि कचाकचा गोळ्या घालून पसार होतात. नंतर अतिरेक्यांना मारले म्हणतात. मारलेच पाहिजे. पण मारून गेल्या नाही तर त्याआधी मारलं पाहिजे. काश्मिर पंडित म्हणताहेत की त्यांचा बळीचा बकरा केला. हे तुमच्या काश्मीर फाईलचं पुढचं पाऊल आहे का? पुढचं पान आहे का? का नाही महागाईवर बोलत? मागे त्यांनी उज्ज्वला योजना आणली. गॅस सिलिंडर हजाराच्या वर झाला. देशाचा आझादी का अमृत महोत्सव आहे. रुपयाचा अमृत महोत्सव होऊन 77च्या पुढे गेला. लाज नाही, लज्जा नाही, कर्तृत्व नाही. लोकांची दिशाभूल करून कारभार करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.