चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव की बॅरिस्टर नाथ पै यांचं? मुख्यमंत्री म्हणतात…
सध्या चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन कोकणातील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादावरुन वाद सुरु आहे.
मुंबई : सध्या चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन कोकणातील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादावरुन वाद सुरु आहे. त्यातच आता या विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं हा नवा प्रश्न समोर आलाय. या विमानतळाच्या नामकरणासाठी दोन दिग्गज नावांचा प्रस्ताव समोर आलाय. यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावांचा समावेश आहे. या दोन्ही नावांचे प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच मुद्द्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचही मत नमूद केलं (CM Uddhav Thackeray stand on name of Chipi Airport ).
खासदार विनायक राऊत म्हणाले, “नारायण राणे यांच्या मागणीचं स्वागत आहे. 2018 पासून नावांबाबत 2 प्रस्ताव आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची लेखी मागणी केली आहे. दुसरीकडे नाथ पै यांच्या नातीने बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांसमोर दोन्ही नावांचे प्रस्ताव दिले आहेत. प्रथम एअरपोर्ट सुरू करा मग नाव द्या, अशी मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय.”
“केंद्राने राज्याला नाव देण्याचा अधिकार असल्याचं सांगितलंय. विमानतळ लवकर चालू करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. 26 जानेवारी 2021 ला हे विमानतळ सुरू करण्याबाबत संबंधितांना सांगितलं आहे. याबाबत परवाना (लायसन्स) मिळालं की लवकरच विमानतळ सुरू करू. हे विमानतळ अत्याधुनिक पद्धतीने बनवलं असल्याने त्याचा मोठा उपयोग होणार आहे,” असंही विनायक राऊत यांनी नमूद केलं.
‘आशिष शेलार यांच्या आरोपातून त्यांचा वैचारिक दरिद्रीपणा दिसतो’
राम मंदिर मुद्द्यावर भाजपने शिवसेनेवर घुसखोरीचा आरोप केल्यानंतर विनायक राऊत यांनी यावर म्हटलं, “आशिष शेलार यांच्या या आरोपातून त्यांचा वैचारिक दरिद्रीपणा दिसून येतो. उद्धव ठाकरे यांनी नेहमीच राम मंदिराच्या बाजूची भूमिका घेतली. त्यांच्या राजकीय घुसखोरीबाबतच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही. राम मंदिर आता कोर्टाच्या ऑर्डर नंतर होतंय, पण राम मंदिराचा पाया बाळासाहेब ठाकरे यांनीच बांधलाय. उद्धव ठाकरे यांनी नंतर इमारतीसाठीचे प्रयत्न केले.”
हेही वाचा :
निवडणुकीच्या तोंडावर चिपी विमानतळ उद्घाटनाचा घाट
CM Uddhav Thackeray stand on name of Chipi Airport