ठाकरे-पवार-आंबेडकर यांचं ठरलं! आता एकनाथ शिंदे यांनीही शोधली राजकीय सोयरिक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणखी बळकट होणार आहे. कारण दलित पँथरने शिंदे गटाला बिनशर्त पाठींबा दिलाय.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणखी बळकट होणार आहे. कारण दलित पँथरने शिंदे गटाला बिनशर्त पाठींबा दिलाय. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीच्या संकेताच्या बातम्या समोर येत असतानाच दलित पँथर आणि शिंदे गटाच्या एकत्र येण्याची बातमी समोर आलीय. त्यामुळे या राजकीय घडामोडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी महत्त्वाच्या आहेत.
आगामी महापालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. या घडामोडींमागे गेल्या चार महिन्यांचा महत्त्वाचा इतिहास देखील आहे. राज्यात शिवसेनासारख्या मोठ्या प्रादेशिक पक्षात फुट पडलीय. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडून पक्षाला पुन्हा बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाला एकटं पाडण्यासाठी महाराष्ट्रातील इतर पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा दिलेला खुला प्रस्ताव हा त्याचाच एक भाग आहे.
महाविकास आघाडीकडून सुरु असलेले हे प्रयत्न पाहता शिंदे गटातही हालचालींना वेग आलाय. विशेष म्हणजे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रकाश आंबेडकरांसोबत राजकीय सोयरीक जुळण्याआधीच शिंदे गटाची दलित पँथरसोबत राजकीय सोयरीक जुळलीय.
दलित पँथरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे. दलित पँथरचे निर्माते नामदेव ढसाळ यांचे आतेभाऊ आणि दलित पँथरचे कार्यकर्ते सुखदेव सोनवणे यांनी याबाबत मोठं विधान केलंय.
दलित पँथर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बिनशर्त पाठिंबा देणार, असं सुखदेव सोनवणे यांनी जाहीर केलंय. कराड येथील दलित पँथरच्या मेळाव्यात शिंदे गटाला जाहीर पाठिंब्याची घोषणा केली जाईल, अशी माहिती दलित पँथरचे कार्यकर्ते सुखदेव सोनवणे यांनी दिली.