राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्यानंतर आता म्हाडाची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई: आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्यानंतर आता म्हाडाची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित आहे की नाही? असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरून हा संताप व्यक्त केला आहे. राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आधी आरोग्य भरती परीक्षेचा घोळ झाला. पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत गेले आहेत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे. किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
विद्यार्थ्यांची थट्टा तरी करू नका
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका. दोषींवर कठोर कारवाई कराच. पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही, असा सवालही त्यांनी केला.
पेपर फोडणारा सूत्रधार अटकेत
आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याच संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यामागचे कारणही तसेच आहे. ज्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख व एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली . हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
कोणत्या पदासाठी होणार होती भरती
म्हाडाच्या भरती परीक्षा एकूण 565 पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येणार होती. यामध्ये कार्यकारी अभियंता स्थापत्य- 13, उप अभियंता स्थापत्य-13, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी- 02, सहाय्यक अभियंता स्थापत्य- 30, सहाय्यक विधी सल्लागार- 01, कनिष्ठ अभियंता स्थापत्य- 119, कनिष्ठ वास्तुशास्त्र सहाय्यक-06, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -44, सहाय्यक- 18, वरिष्ठ लिपिक -73, कनिष्ठ लिपिक टंकलेखक – 207, लघुटंकलेखक – 20, भूमापक- 11, अनुरेखक- 06 पदे भरली जाणार होती.
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत
आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!
भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021
संबंधित बातम्या:
Nashik| नाशिकमध्ये कोरोनामुळे 2 दिवसांत 3 मृत्यू; सध्या 309 रुग्णांवर उपचार सुरू